
सचिन धस, अंकित बावणे, रामकृष्ण घोष, अद्वैत सिधये, राहुल त्रिपाठीची चमकदार कामगिरी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत अद्वैय सिधये याने केलेल्या नाबाद ५८ धावांच्या खेळीसह रामकृष्ण घोष (२-६२ व ५० धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ४ एस पुणेरी बाप्पा संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघावर ५ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ४ एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने आपल्या सलामीच्या जोडीत बदल केला. सचिन धस व अंकित बावणे या जोडीने ६५ चेंडूत ९७ धावांची सलामी दिली. यात सचिन धसने आक्रमक फलंदाजी करत ३३ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. त्याने ५ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करत सुरेख खेळी केली. ३७ धावांवर असताना अद्वैय शिधेने त्याला जीवदान दिले. सचिन धस ३६ चेंडूत ६० धावांची खेळी करून बाद झाला. पुणेरी बाप्पाच्या सोहन जमालेने त्याला झेल बाद केले. पाठोपाठ १२व्या षटकात सोहनने अंकित बावणेला त्रिफळा बाद करून संघाला दुसरा धक्का दिला. अंकितने ३२ चेंडूत ४ चौकारांसह ३५ धावांची खेळी केली. सिद्धार्थ म्हात्रे २६ धावांवर तंबूत परतला. त्याने २ षटकार मारले.
मधल्या फळीतील फलंदाज धनराज शिंदे (५), श्रीकांत मुंढे (२), आनंद ठेंगे (१) हे झटपट बाद झाले. चौथ्या क्रमांकास फलंदाजीस आलेल्या कर्णधार राहुल त्रिपाठीने १७ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने १ चौकार व ५ उत्तुंग षटकार संघाला निर्धारित षटकात १८६ धावाचे आव्हान उभे करून दिले. ४ एस पुणेरी बाप्पा संघाकडून सोहन जमाले (२-२४), सचिन भोसले (२-२२), रामकृष्ण घोष (२-६२) यांनी मोठे आव्हान उभारण्यापासून रोखले.
४ एस पुणेरी बाप्पा संघाला विजयासाठी १८७ धावांचे आव्हान होते. पॉवरप्लेमध्ये यश नाहर (४), मुर्तुझा ट्रंकवाला (९) हे बाद झाल्याने पुणेरी बाप्पा २ बाद ३३ धावा अशा स्थितीत होता. ऋषिकेश सोनावणे २३ धावा, यश क्षीरसागर २५ धावा काढून बाद झाला. त्यामुळे पुणेरी बाप्पा संघ ४ बाद ८० धावा अशा बिकट स्थितीत होता. विजयासाठी पुणेरी बाप्पा संघाला ५५ चेंडूत १०७ धावा असे समीकरण होते. पाचव्या क्रमांकास फलंदाजीस आलेल्या अद्वैय सिधयेने ३६ चेंडूत नाबाद ५८ धावांची झंझावती खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यात त्याने ५ षटकार मारले. त्याला रामकृष्ण घोषने २३चेंडूत ५० धावांची तुफानी खेळी करत साथ दिली. त्यात त्याने १चौकार व ५ टोलेजंग षटकार खेचले. विशेष म्हणजे १६व्या षटकात श्रेयस चव्हाणच्या गोलंदाजीवर रामकृष्णने दोन षटकार आणि अद्वैयने दोन षटकार मारत मैदान दणाणून सोडले. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूत १०१ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. शेवटच्या षटकात ३ऱ्या चेंडूवर रामकृष्ण घोषला आत्मन पोरेने झेलबाद केले. सिद्धार्थ म्हात्रे याने त्याचा अफलातून झेल टिपला. यावेळी पुणेरी बाप्पाला ३ चेंडूत ६ धावांची आवश्यकता होती. प्रथमच सातव्या क्रमांकास फलंदाजीस आलेल्या सूरज शिंदेने विजयी षटकार मारत संघाचा विजय सुकर केला. पुणेरी बाप्पा संघाने हे आव्हान १९.४ षटकात ५ बाद १८७ धावा करून पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स : २० षटकात ७ बाद १८६ धावा (सचिन धस ६०, राहुल त्रिपाठी ४५, अंकित बावणे ३५, सोहन जमाले २-२४, सचिन भोसले २-२२, रामकृष्ण घोष २-६२) पराभुत विरुद्ध ४ एस पुणेरी बाप्पा : १९.४ षटकात ५ बाद १८७ धावा (अद्वैय सिधये नाबाद ५८), रामकृष्ण घोष ५०, सुरज शिंदे नाबाद ६, आनंद ठेंगे २-३३, दीपक डांगी १-१३, रजनीश गुरबानी १-२९). सामनावीर – अद्वैय सिधये.