आदित्य चषक कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर पूर्व, सांगलीची विजयी सलामी

  • By admin
  • June 14, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

पुणे : मुंबई उपनगर पूर्व, सांगली या संघांनी पहिल्या ‘आदित्य चषक’ १८ वर्षांखालील मुले व मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुली व मुलांमध्ये विजयी सलामी दिली.

या स्पर्धेचे उद्घाटक आदित्य ठाकरे वेळेअगोदर उपस्थित राहिल्याने सामने वेळेअगोदर सुरू झाले. पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज बंदिस्त क्रीडा संकुल येथील मॅटवर झालेल्या मुलींच्या पहिल्या सामन्यात मुंबई उपनगर पूर्वने मुंबई शहर पश्र्चिमचा ४५-३५ असा पाडाव केला. मध्यांतरापर्यंत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात २३-१७ अशी उपनगर संघाकडे आघाडी होती. उत्तरार्धा मात्र उपनगराच्या सेरेना म्हसकर, प्रांजल जाधव, आस्था सिंग यांनी अधिक जोषपूर्ण खेळ करीत सामना आपल्या बाजूने झुकवला. मुंबई शहराच्या ऋतिका शिंदे, झारा शेख यांनी निकराची लढत दिली. पण त्यांना अपयश आले.

मुलांच्या सामन्यात सांगलीने अत्यंत चुरशीच्या सामन्यात पुणे ग्रामीणचा प्रतिकार ३६-२९ असा मोडून काढला. विश्रांतीला १७-१८ अशा पिछाडीवरून सांगलीने ही विजयाची किमया साधली. शेवटची ५ मिनिटे पुकारली तेव्हा २८-२८ अशी बरोबरी होती. पण सांगलीच्या यशराज आडकेने शेवटच्या २मिनिटात शिलकी २ गडी टिपत पुण्यावर लोण देत आपला विजय निश्चित केला. यशला आदित्य जाधवची उत्तम साथ लाभली. सांगलीने ४ अव्वल पकडी देखील केल्या. पुण्याचा सुरज चांदणे एकाकी लढला.

या स्पर्धेचे उदघाटन शिवसेनाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्पर्धा आयोजक आमदार सचिन अहिर, राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *