पुणे वॉरियर्स संघाला पहिले विजेतेपद

  • By admin
  • June 15, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग ः अनुजा पाटील सामनावीर

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रोमहर्षक अंतिम लढतीत कर्णधार अनुजा पाटील (नाबाद ३० धावा व २-३०) हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघावर १ धावेने थरारक विजय मिळवत पहिलेवहिले विजेतेपद संपादन केले. याआधीच्या साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध दोन्ही लढतीत सोलापूर स्मॅशर्स संघावर विजय मिळवला होता. या विजयाबरोबरच पुणे वॉरियर्स संघाने आपली अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत सुरुवातीला पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्यात आला. सोलापूर स्मॅशर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर खुशी मुल्ला १७ धावा काढून तंबूत परतली. त्यात तिने ३ चौकार मारले. सोलापूरच्या शरयू कुलकर्णीने खुशीला झेलबाद केले व संघाला पहिला धक्का दिला. सुहानी कहांडळने २० धावा काढून बाद झाली. त्यानंतर अक्षया जाधवने २३ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह २९ धावा काढून संघाची धावगती वाढवली.

कर्णधार अनुजा पाटीलने २१ चेंडूत नाबाद ३० धावांची संयमी खेळी केली. तिने २ चौकार व १ षटकार खेचले. अनुजाने श्वेता मानेच्या समवेत चौथ्या विकेटसाठी ३८ चेंडूत ५३ धावांची भागीदारी करून संघाला १८ षटकात ६ बाद १२९ अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. सोलापूर स्मॅशर्सकडून स्वांजली मुळे (२-६), आचल अगरवाल (२-२६) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

१२९ धावांचे आव्हान सोलापूर स्मॅशर्स संघाला १८ षटकात ६ बाद १२८ धावाच करता आल्या. सोलापूरची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ईश्वरी अवसरे (८) धावांवर तंबूत परतली. तिला पुणे वॉरियर्सच्या अनुजा पाटीलने झेलबाद केले. त्यानंतर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधार तेजल हसबनीसने आक्रमक सुरुवात केली. तिने २ चौकार व १ षटकार ठोकला. पण पुणे वॉरियर्सच्या इशिता खळेने तिला पायचीत केले व सोलापूर स्मॅशर्सला मोठा धक्का दिला. ईश्वरी सावकारने २० चेंडूत १ चौकारासह २२ धावांची खेळी करून धावफलक हलता ठेवला. ईश्वरी सावकारला चोरटी धाव घेत असताना धावबाद झाली. मुक्ता मगरेने एकाबाजूने संघाची धुरा सांभाळताना ४० धावांची खेळी केली. मुक्ता मगरेला इशिता खळेने झेलबाद करून सामन्यातील रोमांच वाढवला. शाल्मली क्षत्रिय हिने (३४) संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सोलापूर स्मॅशर्स संघाला विजयासाठी ६ चेंडूत ९ धावांची आवश्यकता होती. हे षटक कर्णधार अनुजा पाटीलने घेतले. पहिल्या चेंडूवर दामिनी बनकरने एक धाव घेतली. त्यानंतर शाल्मलीने चौकार मारत विजयाचे लक्ष्य आणखी कमी केली. पण चौथ्या चेंडूवर शाल्मलीला तिने अनुजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेतला व सामन्यात रंगत आणली. १ चेंडूत २ धावांची गरज असताना स्वांजली मुळेने अनुजाच्या हातात चेंडू मारला व अनुजाने मिळालेल्या संधीचे सोने करत तिला धावबाद केले व विजयावर शिक्कामोर्तब केले.

विजेत्याला २० लाखांचे पारितोषिक

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व २० लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व १० लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीएचे मानद सचिव अ‍ॅड कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य शुभेंद्र भांडारकर, सुहास पटवर्धन, राजू काणे, सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, केशव वझे, अजय देशमुख, कल्पना तापीकर, सीईओ अजिंक्य जोशी, तसेच सर्व संघ मालक, सर्व जिल्हा संघटनेचे सदस्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संक्षिप्त धावफलक

पुणे वॉरियर्स : १८ षटकात ६ बाद १२९ धावा (अनुजा पाटील नाबाद ३०, अक्षया जाधव २९, श्वेता माने २५, ख़ुशी मुल्ला १७, सुहानी कहांडळ २०, स्वांजली मुळे २-६, आचल अगरवाल २-२६, शरयू कुलकर्णी १-१९) विजयी विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स : १८ षटकात ६ बाद १२८ धावा (मुक्ता मगरे ४०, शाल्मली क्षत्रिय ३४, ईश्वरी सावकार २२, तेजल हसबनीस १६, इशिता खळे २-२४, अनुजा पाटील २-३०). सामनावीर – अनुजा पाटील.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

सर्वोत्कृष्ट फलंदाज : ईश्वरी सावकार (२४७धावा, सोलापूर स्मॅशर्स)

सर्वोत्कृष्ट गोलंदाज : चिन्मयी बोरफळे (१३विकेट, पुणे वॉरियर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *