
एशियन स्पोर्ट्स एरोबिक्स चॅम्पियनशिप
सोलापूर ः दुबई येथे झालेल्या एशियन स्पोर्ट्स एरोबिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सोलापूरच्या ३ खेळाडूंनी चार सुवर्ण व दोन रौप्य अशी सहा पदकांची कमाई केली आहे. सोलापूरच्या इतिहासात प्रथमच स्पोर्ट्स एरोबिक्स आणि हिप हॉप चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदके मिळाली आहेत.
आशियातील सहा देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतातील ४० खेळाडूंच्या संघात येथील तीन खेळाडूंचा समावेश होता. या तीनही खेळाडूंनी ही विशेष कामगिरी केली. भारतातील सर्व खेळाडूंनी ३० सुवर्ण, २९ रौप्य आणि ३५ कांस्य पदकांची घवघवीत कमाई करून चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविली आहे.
या स्पर्धेत येथील स्ट्रीमलाईन अकॅडमीचे प्रशिक्षक डॉ मोहिनी ताकते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरा गनेर, हीर गाला, अनुष्का चव्हाण या खेळाडूंनी ही कामगिरी केली. अनुष्का व हीर या जोडीने सात वर्षांखालील वयोगटात सुवर्ण तर वैयक्तिक प्रकारात या दोघींनी विभागून सुवर्णपदक मिळवले. पंधरा वर्षांखालील वयोगटात वैयक्तिक खेळ प्रकारात स्वराने रौप्य पदक पटकावले. पंधरा वर्षांखालील जोडीमध्ये सारा शेख व स्वरा या जोडीने रौप्य पदक मिळविले.