 
            छत्रपती संभाजीनगर ः पुणे येथील उंड्री भागात झालेल्या महाराष्ट्र राज्य स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या ह्रिधान गाडेकर याने सुवर्णपदक जिंकून स्पर्धा गाजवली.
या स्पर्धेत ह्रिधान गाडेकर याने आपल्या कौशल्य आणि दृढनिश्चयाचे उल्लेखनीय प्रदर्शन करत जेतेपद मिळवले. ह्रिधानने अंडर ११ गटात विजेतेपद संपादन केले. त्याने तन्मय (पुणे) विरुद्ध ११-७, ११-५, अभिर चुटे (अमरावती) विरुद्ध ११-१, ११-४, उपांत्य फेरीत रुद्र ताठे (सीएसएन) विरुद्ध ११-७, ११-९ असे विजय साकारत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत शंतनू कौठेकर (अमरावती) विरुद्ध ११-६, १२-१० असा विजय मिळवला आणि ह्रिधान गाडेकर याने विजेतेपद पटकावले.
ह्रिधान गाडेकर याने असाधारण तंत्र, चपळता आणि मानसिक ताकद दाखवून प्रतिष्ठित सुवर्णपदक मिळवले. भारतीय स्क्वॉश मधील उगवता तारा म्हणून त्याची क्षमता अधोरेखित करते. पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांच्या हस्ते ह्रिधान गाडेकरचा सत्कार करण्यात आला.
ह्रिधान हा नाथ व्हॅली स्कूलचा विद्यार्थी आहे. नाथ व्हॅली शाळेचे संचालक रणजित दास, प्राचार्य डॉ स्वरूप दत्ता, उपप्राचार्या अपर्णा माथूर, मुख्याध्यापिका सरबजीत दासगुप्ता, अर्चना कुलकर्णी व प्रशिक्षक कल्याण गाडेकर, रोहित गाडेकर, सचिन शिंदे यांनी त्याचे अभिनंदन केले. महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, सचिव डॉ दयानंद कुमार, शशिकांत शेळके, शैलेश घोडके, अमित राजळे, पटेल, मनीष आंबेकर यांनी अभिनंदन केले. त्याला कल्याण गाडेकर, रोहिदास गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.



