चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जागतिक मल्लखांब दिन जल्लोषात साजरा 

  • By admin
  • June 15, 2025
  • 0
  • 96 Views
Spread the love

मल्लखांबच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील ः दीपक पाटील 

नाशिक ः पंधरा जून हा दिवस जागतिक मल्लखांब दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळा आणि नाशिक जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मल्लखांब दिन साजरा करण्याच्या हेतूने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

रविवारी (१५ जून) सकाळी १० वाजता मल्लखांब हॉलमध्ये याची सुरवात झाली. यावेळी यशवंत व्यायाम शाळेचे सर्व मल्लखांबपटू यांनी विविध प्रकारचे चित्तथराक प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर मुलींही आपले मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब यांचे विविध प्रकार सादर केले. यामध्ये स्वराज पाटील, अलख गीते, अवनी रत्नपारखी, पूर्वा भांबरे, ओवी वाटपाडे, रुद्र जैन, विराज म्हस्के, कार्तिक गुगळे, कल्पेश खाने, स्वरूप मोरे, अर्णव सोनावणे, सर्वेश माळोदे, अर्चित चव्हाण, आर्या पळसुळे, ओवी गंभिरे आदी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर पदक प्राप्त मल्लखांबपटू यांचा समावेश होता. 

या कार्यक्रमासाठी यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ, ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक आबासाहेब घाडगे, कार्यकारी सदस्य अविनाश पाटील, डॉ जयराम महाबळ, आनंद खरे, उमेश कर्पे, प्रशांत गायकवाड, क्रीडा अधिकारी उत्तरा खानापुरे, अविनाश खैरनार, संदीप शिंदे, शशांक वझे, विनायक दंडवते, किरण कवीश्वर तसेच त्रंबकेश्वर येथील राजा शिवछत्रपती व्यायाम शाळेचे प्रमुख सत्यप्रिय शुक्ल, अभिषेख कोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गेल्या वर्षांमध्ये विविध राज्य आणि राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत पदके प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.   

क्रॅश मॅटची भेट 
या जागतिक मल्लखांब दिनाचे औचित्य साधून त्रिंबकेश्वर येथील राजा शिवछत्रपती व्यायामशाळेच्या मल्लखांब केंद्राला यशवंत व्यायाम शाळा आणि जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या वतीने चाळीस हजार रुपये किंमतीची मॅट भेट देण्यात आले. त्रिंबकेश्वर येथे व्यायामशाळेतील माजी मल्लखांब खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी मल्लखांब केंद्र सुरू केले आहे. तेथे ४०-५० मुले-मुली मल्लखांबाचा सराव करतात. त्यांना अवघड मल्लखांब प्रकारांसाठी क्रॅश मॅटची आवश्यकता आणि गरज लक्षात घेऊन याची पूर्तता करण्यात आली असे यावेळी सांगण्यात आले.  
यावेळी बोलताना दीपक पाटील यांनी सांगितले की, मल्लखांब हा बेसिक खेळ आहे.याची सुरवात नाशिकमध्ये कोठुरे येथे झाली आहे, ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. मल्लखांब या खेळामुळे खेळाडूंचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य कायम तंदुरुस्त राहते. त्यामुळे या खेळाच्या उत्तोरत्तर प्रगतीसाठी यशवंत व्यायाम शाळा आणि जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या वतीने वेगवेगळे  उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही दिली.  

हा उपक्रम उत्तम रितीने साजरा व्हावा यासाठी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत जाधव, ऋषिकेश ठाकूर, मिथिला पैठणकर, मनीषा गाढवे, स्नेहा जाधव आणि सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *