
राहुल त्रिपाठी, आनंद ठेंगेची शानदार कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कर्णधार राहुल त्रिपाठी (५३) याने केलेल्या सुरेख फलंदाजीसह आनंद ठेंगे (४-२९) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्सच्या आनंद ठेंगे (४-२९), दीपक डांगी (३-२७), आत्मन पोरे (२-३१) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्सचा डाव १९.४ षटकात सर्वबाद १५९ धावांवर संपुष्टात आला.

विकी ओस्तवाल (२२) व सिद्धेश वीर (२१) यांनी २२ चेंडूत ३९ धावांची सलामी दिली. कोल्हापूरच्या आनंद ठेंगे याने या सलामी जोडीला झेलबाद केले. त्यानंतर नीरज जोशीने २७ चेंडूत १ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. ओंकार खाटपे १६, हर्ष मोगावीरा १०, ऋषभ राठोड १० यांच्या धावा वगळता तळातील फलंदाज दुहेरी खेळी करू शकला नाही.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला विजयासाठी १६० धावांचे आव्हान होते. अंकित बावणे व सचिन धस या जोडीने २४ चेंडूत ४२ धावांची भागीदारी करून सुरेख सुरुवात करून दिली. सचिन धस २९ धावा, तर अंकित बावणे १५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सिद्धार्थ म्हात्रेला (०) तनय संघवीने पायचीत बाद केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या कर्णधार राहुल त्रिपाठीने ४३ चेंडूत ५३ धावांची आक्रमक खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यात त्याने ५ चौकार मारले. राहुल त्रिपाठी व विशांत मोरे (२२) यांनी सहाव्या विकेटसाठी ३० चेंडूत ४९ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले.

शेवटच्या ६ चेंडूत ६ धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर धनराज शिंदेने एक धाव घेतली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेऊन हे आव्हान २ चेंडूत ३ धावा असे कमी केले. त्यानंतर शेवटच्या चेंडूंवर अतिरिक्त धावा कोल्हापूर संघाला मिळाल्या व कोल्हापूर टस्कर्स संघाने हे आव्हान २० षटकात ८ बाद १६२ धावा करून पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स : १९.४ षटकात सर्वबाद १५९ (नीरज जोशी ४९, विकी ओस्तवाल २२, सिद्धेश वीर २१, ओंकार खाटपे १६, हर्ष मोगावीरा १०, ऋषभ राठोड १०, आनंद ठेंगे ४-२९, दीपक डांगी ३-२७, आत्मन पोरे २-३१) पराभुत विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स : २० षटकात ८ बाद १६२ (राहुल त्रिपाठी ५३, विशांत मोरे २२, सचिन धस २९, दीपक डांगी १२,धनराज शिंदे नाबाद ६, तनय संघवी ३-२७, विकी ओस्तवाल १-२२). सामनावीर – राहुल त्रिपाठी.