
ठाणे – महाराष्ट्र राज्य धनगर प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित धनगर रत्न पुरस्कार सोहळा १५ जून रोजी उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात प्रमोद धोंडीराम वाघमोडे यांना विशेष अहिल्या रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व माध्यम क्षेत्रातील कार्याची दखल घेत हा मान त्यांना बहाल करण्यात आला.
प्रमोद वाघमोडे यांची अलीकडील काळात तीन महत्त्वपूर्ण पदांवर निवड झाली आहे. त्यात दैनिक स्पोर्ट्स प्लस (मराठी व इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र) सहसंपादक, जिल्हाध्यक्ष (ठाणे) व विभाग संपर्कप्रमुख (मुंबई विभाग) महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आणि विभागीय सचिव- महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच या पदांवर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
याशिवाय, ८ मार्च महिला दिनानिमित्त, तसेच महाराणी अहिल्यादेवी होळकर शताब्दी जयंती महोत्सव वर्षानिमित्त, ठाणे शहरात भारतातील पहिली “अहिल्या दौड” यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. हा पुरस्कार खासदार नरेश म्हस्के व आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या गौरवाबद्दल प्रमोद वाघमोडे यांनी आयोजक मंडळ, प्रमुख पाहुणे आणि आपला धनगर समाज यांचे मन:पूर्वक आभार मानले. आपल्या प्रेमामुळेच हा सन्मान मिळाला आहे. समाजासाठी कार्य करत राहण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे अधिक दृढ झाली आहे, असे वाघमोडे म्हणाले.