
बदली खेळाडूंची घोषणा
नवी दिल्ली ः भारतीय कसोटी संघ २० जूनपासून इंग्लंड दौऱ्याला सुरुवात करणार असताना भारतीय १९ वर्षांखालील संघ आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली २४ जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर पहिला सामना खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारतीय १९ वर्षांखालील संघाला मोठा धक्का बसला आहे कारण संघातील २ खेळाडू जखमी झाले आहेत. हे खेळाडू आदित्य राणा आणि खिलन पटेल आहेत. दोन्ही खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.
ज्युनियर क्रिकेट समितीने आगामी भारत १९ वर्षांखालील इंग्लंड दौऱ्यासाठी आदित्य राणा आणि खिलन पटेल यांच्या जागी डी दीपेश आणि नमन पुष्पक यांचा संघात समावेश केला आहे. दीपेश आणि नमन दोघांनाही दौऱ्यासाठी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू असलेल्या हाय परफॉर्मन्स कॅम्प दरम्यान आदित्यला पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाला, तर खिलनच्या उजव्या पायात समस्या आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला दोन्ही खेळाडूंच्या बदलीची घोषणा करावी लागली आहे.
आयुष म्हात्रे संघाचा कर्णधार
बीसीसीआयने २२ मे रोजीच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर १९ संघाची घोषणा केली होती. संघाची कमान आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली होती तर आयपीएल २०२५ मध्ये फलंदाजीने धुमाकूळ घालणारा वैभव सूर्यवंशी याचाही संघात समावेश करण्यात आला होता. आता दौरा सुरू होण्याच्या काही दिवस आधी संघात बदल करण्यात आला आहे. भारताच्या गोलंदाजी हल्ल्यात प्रणव राघवेंद्रसारखे गोलंदाज आहेत, ज्यांनी बेंगळुरू येथील एनसीए कॅम्प दरम्यान १४७ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून प्रसिद्धी मिळवली होती. दुसरीकडे, इंग्लंड लायन्सने देखील एक मजबूत संघ निवडला आहे, ज्यामध्ये इंग्लंडचा माजी स्टार अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफचा समावेश आहे.
भारतीय १९ वर्षांखालील संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, युधाजित गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, अनमोलजीत सिंग, डी दीपेश, सलाम पुष्पक.
भारतीय १९ वर्षांखालील संघाचा इंग्लंड दौरा
२४ जून : ५० षटकांचा सराव सामना (लॉफबरो विद्यापीठ)
२७ जून : पहिला एकदिवसीय सामना (होव्ह)
३० जून : दुसरा एकदिवसीय सामना (नॉर्थम्प्टन)
२ जुलै : तिसरा एकदिवसीय सामना (नॉर्थम्प्टन)
५ जुलै : चौथा एकदिवसीय सामना (वॉर्सेस्टर)
७ जुलै : पाचवा एकदिवसीय सामना (वॉर्सेस्टर)
१२-१५ जुलै : पहिला मल्टी-डे (बेकनहॅम)
२०-२३ जुलै : दुसरा मल्टी-डे (चेम्सफोर्ड)