
एसएनडी सीबीएसई स्कूल मान्सून टी २० ट्रॉफी
येवला (जि. नाशिक) ः एसएनडी सीबीएसई स्कूल क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित मान्सून टी २० क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत साईकृपा क्रिकेट अकॅडमीने जबरदस्त कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
या गटात तीन संघांचा समावेश होता. साईकृपा क्रिकेट अकॅडमी, वॉरियर्स इलेव्हन आणि एसएनडी अकॅडमी (ब) यांचा समावेश आहे. गटातील दोन्ही सामने जिंकत साईकृपा संघाने अंतिम फेरी गाठली.
वॉरियर्स इलेव्हन विरुद्धच्या सामन्यात साईकृपा संघाच्या साहिल शेख याने दमदार ४७ धावा करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. अर्णव आव्हाड याने त्याला साथ देत ३७ धावा केल्या. गोलंदाजीत गौरव लिंबारे याने ४ बळी घेत विरोधी संघाचा डाव खिळखिळा केला.
एसएनडी अकॅडमी (ब) संघाविरुद्धच्या सामन्यात साईकृपा संघाच्या सनी धीवर याने उत्कृष्ट ५३ धावा करत संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर तीर्थ ठोळे याने ४ बळी घेत प्रभावी माऱ्याने विरोधी संघास अडचणीत आणले. एसएनडी अकॅडमी (ब) संघाकडून प्रशांत आहेर याने देखील ५३ धावा करत एकमेव लढा दिला.
साईकृपा क्रिकेट अकॅडमी संघाने दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत फायनलमध्ये दमदार प्रवेश केला आहे. स्पर्धेचे आयोजन एसएनडी सीबीएसई स्कूल क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक अमोल गायकवाड, आदित्य भड, प्रसाद जाधव यांनी केले आहे.