
पुणे ः “महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपल्या कौशल्यांची उजळणी करून राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देते, असे मत ईगल्स नाशिक टायटन्स संघाचा कर्णधार व अनुभवी फिरकीपटू प्रशांत सोळंकी यांनी व्यक्त केले.
चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आयपीएलमध्ये खेळलेला प्रशांत सोळंकी हा सध्या एमपीएलमध्ये प्रभावी प्रदर्शन करत आहे. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये त्याने सहापेक्षा अधिक गडी बाद करत उत्कृष्ट गोलंदाजी सादर केली आहे. सध्या स्पर्धेतील आघाडीच्या विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे.
सोळंकी म्हणाला, “आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळण्याचा अनुभव एमपीएलमध्ये फारच उपयोगी ठरतो आहे. माझ्या संघात अनुभवी आणि नवोदित अशा दोन्ही प्रकारचे खेळाडू असून त्यांच्याकडून मला सातत्याने मार्गदर्शन मिळते. त्यामुळे माझी नेतृत्वशैली अधिक समृद्ध होत आहे.”
फिरकीला पूरक खेळपट्टी असल्यास त्याचा कल्पकतेने कसा उपयोग करता येईल याचे नियोजन करत असल्याचेही त्याने सांगितले. “खेळपट्टी फिरकीस पोषक नसली तरीही आपल्या कौशल्याचा वापर करून किफायतशीर गोलंदाजी कशी करावी हे मी धोनीकडून शिकलो आहे,” असे तो म्हणाला.
महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वावर भाष्य करताना सोळंकी म्हणाला, “संघ संकटात असताना शांतचित्ताने आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणे, हे धोनीकडून शिकण्यासारखे आहे. माझ्या दृष्टीने तो संकटमोचन हनुमानासारखा आहे. त्याच्याकडून संघबांधणी, गोलंदाजी नियोजन आणि डावपेच आखण्याची शैली मी आत्मसात केली आहे.”
त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वर्ष सराव गटात आणि त्यानंतर तीन वर्षे मुख्य संघात खेळण्याचा अनुभवही शेअर केला. ईगल्स नाशिक टायटन्स संघातील यष्टीरक्षक मंदार भंडारी याचे विशेष उल्लेख करताना सोळंकी म्हणाला, “यष्टीरक्षक हाच उत्तम कर्णधार असतो, कारण फलंदाजांची शैली, चुका आणि धोरणे तो जवळून पाहू शकतो. मंदारकडून मला मिळणाऱ्या सूचना माझ्या गोलंदाजीसाठी फार उपयुक्त ठरतात.”
“एमपीएलमुळे राज्यातील युवा खेळाडूंना मोठ्या स्पर्धांसाठी तयार होण्याची संधी मिळते आहे. अशा दर्जेदार लीगमुळे क्रिकेटमधील भविष्य निश्चितपणे उज्वल आहे,” असा विश्वासही प्रशांत सोळंकीने व्यक्त केला.