
राज्य चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धा
पुणे ः पहिल्या आदित्य चषक १८ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुणे ग्रामीण संघाने मुलींच्या गटात आणि परभणी जिल्हा संघाने मुलांच्या गटात शानदार कामगिरी नोंदवत विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोशिएनच्या मान्यतेने आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती महिला संघाने या सामन्याचे आयोजन केले होते. पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने पिंपरी चिंचवड संघाचा प्रतिकार चुरशीच्या लढतीत ३३-३२ असा संपवत जेतेपद पटकाविले.

आक्रमक सुरुवात करीत पिंपरी चिंचवडने पहिला लोण देत १२-०३ अशी भक्कम आघाडी घेतली. पूर्वार्धात १७-०७ अशी आघाडी होती. पण उत्तरार्धात डाव पलटी झाला. पुणे ग्रामीण संघाने उत्तरार्धात जोरदार कम बॅक करीत शेवटच्या काही मिनितात २४-२४ अशी बरोबरी साधली. शेवटी लोण देत २८-२६ अशी आघाडी घेत १गुणाने बाजी मारली. वर्षा बनसडे, सई शिंदे यांच्या कल्पक चढायांना सानिका वाकसेची मिळालेली पकडीची भक्कम साथ त्यामुळे हा विजय शक्य झाला. संतोषी थोरवे, कार्तिक घेरवे यांच्या चढाया उत्तरार्धात कमी पडल्या. सानिका पांडुरे हिचा बचावही कमी पडला. म्हणून पिंपरी चिंचवडला निसटत्या पराभवाला सामोरी जावे लागले.
मुलांच्या अंतिम सामन्यात परभणी संघाने छत्रपती संभाजीनगर संघावर ४१- २१ असा सहज विजय साकारत जेतेपदावर आपले नाव कोरले. विश्रांतीपर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात परभणी संघाकडे १८- १२ अशी आघाडी होती. पूर्वार्धात एक व उत्तरार्धात २ लोण देत परभणीने हा विजय सोपा केला. सारंग रोकडे, किशोर जगताप यांच्या आक्रमक चढाया त्यांना सोमेश्वर खोपे, जीवन जाधव यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ त्यामुळे हे शक्य झाले. छत्रपती संभाजीनगरच्या नागेश पवार, विराज राठोड, शुभम गवळी यांच्या प्रतिकार उत्तरार्धात कमी पडला.
या अगोदर झालेल्या मुलींच्या उपांत्य सामन्यात पिंपरी चिंचवडने मुंबई उपनगर पूर्वेचे आव्हान ३०-२५ असे संपविले. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात १६-१२ अशी आघाडी पिंपरी चिंचवड कडे होती. ज्ञानेश्वरी लांडे, संतोषी थोरवे, डिंपल पिंपरी चिंचवड कडून, तर तन्वी बारगडे, भैरवी म्हात्रे, पूजा चिंदरकर उपनगर कडून उत्कृष्ट खेळले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुणे ग्रामीणने जालन्याला ३२-१९ असे नमवित अंतिम फेरी गाठली. सई शिंदे, सुहानी माने, सानिका वळसे पुणे ग्रामीण कडून, तर मोनिका पवार, कल्याणी शिंदे जालना कडून उत्तम खेळले.
मुलांच्या उपांत्य सामन्यात परभणीने पिंपरी चिंचवडला ४८-३७ असे, तर छत्रपती संभाजीनगरर संघाने जळगावला ४०-३७ असे नमवित अंतिम फेरीत धडक दिली होती.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार व दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी स्पर्धा आयोजक सचिनभाऊ अहिर, सुषमा अंधारे, ॲड अनिल परब, आदित्य शिरोडकर, राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.