एसएसकेकेएतर्फे आयोजित प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

  • By admin
  • June 19, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

मुंबई ः मुंबईतील नामांकित शितो रियू स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित ३० वे वार्षिक कराटे आणि किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर यंदा उत्साहात साजरे झाले.

जशन फॉर्म्स या निसर्गरम्य ठिकाणी ११ ते १३ जून असे तीन दिवस चाललेल्या या शिबिरात शिस्त, मेहनत आणि जोश यांचे अचूक मिश्रण पाहायला मिळाले. या शिबिरात प्रशिक्षण देण्याची जबाबदारी उमेश मुरकर, विघ्नेश मुरकर, राहुल साळुंखे, विन्स पाटील, रोशन शेट्टी, अलोक ब्रीद आणि आशिष महाडिक या आंतरराष्ट्रीय विजेत्या आणि अनुभवी प्रशिक्षकांनी सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळाले.

पहिला दिवशी स्वागत समारंभ, नाश्ता आणि विश्रांतीनंतर ब्लॅक बेल्ट परीक्षार्थींसाठी लेखी परीक्षा आणि फिटनेस ट्रेनिंग घेतले गेले. अन्य विद्यार्थ्यांसाठी खेळ, जलतरण व विश्रांतीसाठी वेळ उपलब्ध होता. त्यानंतर कोअर वर्कआउट, फंडामेंटल्स ट्रेनिंग, आणि वुशु, बॉक्सिंग, मुआय थाय यांचा परिचय दिला गेला. संध्याकाळी स्पारिंग सेशन आणि नियमांचे प्रात्यक्षिक, तसेच सामूहिक स्नेहसंमेलन देखील रंगतदार ठरले.

दुसऱ्या दिवशी ब्लॅक बेल्ट धारकांसाठी प्रशिक्षण, काता सराव आणि ताई वाजा, अशी वाजा यांसारख्या तंत्रांची सराव सत्रे पार पडली. ज्युदो, कुडो आणि तायक्वांदो यांचा परिचय देण्यात आला. बुन्काय डेमोन्स्ट्रेशन, कुमीते सादरीकरण आणि विशेष चर्चा सत्र घेण्यात आले. गाणी, नृत्य आणि खेळांनी भरलेला स्नेहवर्धन कार्यक्रम खूपच उत्साहवर्धक होता.

तिसऱ्या दिवशी किक बॉक्सिंग कंडिशनिंग, फायनल ड्रिल्स आणि फीडबॅक सत्रांनंतर विद्यार्थ्यांनी जलतरणाचा आनंद घेतला. शिबिराचा समारोप समारंभ, प्रमाणपत्र वाटप आणि सामूहिक फोटो सत्रानंतर संध्याकाळी परतीचा प्रवास करण्यात आला. या शिबिराने केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे तर नैतिक मूल्य, वेळपालन आणि नेतृत्वगुण देखील विद्यार्थ्यांमध्ये विकसित केले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेच्या सीमांना पार करत स्वतःला सिद्ध केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *