
आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धा
पुणे ः शौरेन सोमण व नैशा रेवसकर या पुण्याच्या युवा खेळाडूंची आगामी आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारताच्या पंधरा वर्षांखालील संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा २६ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत ताश्कंद (कझाकिस्तान) येथे आयोजित केली जाणार आहे.
शौरेन याने आतापर्यंत तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्यामध्ये त्याने तेरा वर्षाखालील व पंधरा वर्षाखालील गटाच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तसेच तो पंधरा वर्षाखालील गटात राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रौप्य पदक विजेता खेळाडू आहे. तो सिम्बॉयसिस प्रशालेमध्ये इयत्ता दहावीत शिकत आहे.
नैशा हिने आतापर्यंत चार वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले असून तिने एकदा रौप्य व दोन वेळा कांस्यपदक जिंकले आहे. तिने १३ व १५ वर्षाखालील गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत रुपेरी यश संपादन केले आहे. एन आय ओ एस योजनेअंतर्गत ती नवव्या इयत्तेत शिकत आहे.
या दोन्ही खेळाडूंनी आजपर्यंत राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे आणि पुण्यालाही घवघवीत यश मिळवून दिले आहे. हे दोन्ही खेळाडू एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.