४ एस पुणेरी बाप्पा-ईगल नाशिक टायटन्स क्वालिफायर सामना रंगणार

  • By admin
  • June 19, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

एलिमिनेटर लढतीत रायगड रॉयल्ससमोर पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचे आव्हान

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रिमियर लीग (एमपीएल) स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये क्वालिफायर १ लढतीत ४ एस पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्यात दुपारी २ वाजता चुरशीचा सामना रंगणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता एलिमिनेटर लढतीत रायगड रॉयल्ससमोर पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचे आव्हान असणार आहे.  

क्वालिफायर १ सामना गुणतालिकेत अव्वल दोन संघांमध्ये होणार आहे. ईगल नाशिक टायटन्स संघाचे १० सामन्यातून १३ गुण आहेत तर ४ एस पुणेरी बाप्पा १२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यातील विजयी संघ एमपीएलच्या अंतिम सामन्याला थेट पात्र ठरणार असून तर पराभूत संघाला क्वालिफायर २च्या माध्यमातून अंतिम फेरी गाठण्याची अजून एक संधी मिळणार आहे.

याचबरोबर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या रायगड रॉयल्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सायं ७ वाजता एलिमिनेटर सामना होईल. यातील विजेता संघ क्वालिफायर १ मधील पराभूत संघाशी अंतिम फेरीतील स्थानासाठी लढणार आहे.  

क्वालिफायर १ मध्ये सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघासमोर ४ एस पुणेरी बाप्पाचे कडवे आव्हान असणार आहे. याआधीच्या साखळी फेरीच्या लढतीत रोहन दामलेच्या एकहाती खेळीच्या जोरावर नाशिक संघाने पुण्यावर पाच गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसरा साखळी सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे ४ पुणेरी बाप्पा संघ आपल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक असणार असून दुसऱ्या बाजूला ईगल नाशिक टायटन्स संघ पुणेरी बाप्पा विरुद्ध आपली विजयी मालिका कायम राखण्यासाठी उत्सुक असणार आहे.

नाशिकच्या संघात यष्टीरक्षक-फलंदाज मंदार भंडारी, अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी,  साहिल पारेख, रोहन दामले, अथर्व काळे अशी फलंदाजांची तगडी फळी आहे. त्या फळीला रोखण्याचं आव्हान पुण्याच्या निकित धुमाळ, सचिन भोसले, रामकृष्ण घोष ह्या वेगवान गोलंदाजांसमोर असणार आहे. त्यांच्या जोडीला डावखुरा लेगस्पिनर रोशन वाघसरे व डावखुरे फिरकी गोलंदाज सोहन जमाले व रोहन खरात यांच्या समोर असणार आहे.  

नाशिकच्या गोलंदाजीच्या ताफ्यात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आहे. त्याच्या जोडीला मनोज इंगळे व आरशीं कुलकर्णी आहेत तर फिरकीची मदार सध्या सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कर्णधार प्रशांत सोळंकी व अक्षय वाईकर यांच्यावर असेल. या  गोलंदाजीसमोर पुण्याच्या फॉर्ममध्ये असलेल्या यश नाहर व मुर्तुझा ट्रंकवाला या सलामीच्या जोडीचं आव्हान असेल. त्याच बरोबर मधल्या फळीत येऊन कर्णधार यश क्षीरसागर, अद्वैय शिधये, रामकृष्ण घोष व सुरज शिंदे यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

एलिमिनेटरच्या सामन्यात रायगडच्या संघासमोर कोल्हापूरचे आव्हान असेल. पहिल्या साखळी सामन्यात कोल्हापूरने रायगडवर दोन गडी राखून निसटता विजय मिळवला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवून पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढायची रायगडला संधी आहे. रायगडचा सलामीवीर सिद्धेश वीर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही सामन्यात त्याने सातत्याने धावा करुन रायगडला प्लेऑफ मध्ये  स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. गेल्या काही सामन्यात विकी ओस्तवालने सलामीला येऊन रायगडला चांगली सुरुवात करुन दिली आहे. कर्णधार रिषभ राठोडला अजून फलंदाजीत हवा तसा सूर गवसला नाहीये पण त्याने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. रायगडच्या संघात विकी ओस्तवालच्या जोडीला सागर जाधव, निखिल कदम, तनय संघवी, हितेश वाळुंज असे गोलंदाज आहेत.

दुसऱ्या हाताला, कोल्हापूरच्या संघाने गेल्या काही सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. सचिन धसने सलामीला येऊन संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे व त्याला कर्णधार राहुल त्रिपाठीने चौथ्या क्रमांकावर येऊन चांगली जोड दिली आहे. रायगड विरुद्धच्या सामन्यात त्या दोघांच्या फलंदाजीने कोल्हापूरने विजय मिळवला होता. त्यामुळे कोल्हापूरला आशा असेल कि त्या कामगिरीची ते पुनरावृत्ती करतील. अनुभवी अंकित बावणे व युवा सिद्धार्थ म्हात्रे ह्यांनी त्या दोगांसह फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. गोलंदाजीत, अनुभवी रजनीश गुरबानीच्या साथीला आत्मन पोरे, आनंद ठेंगे, श्रेयस चव्हाण असे म्होरके आहेत.  त्यामुळे या सामन्यात कोल्हापूरचं पारडं थोडं जड असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *