लातूर विभागीय क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा

  • By admin
  • June 20, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

लातूर ः कव्हा, लातूर या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.

ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अध्यादेश काढण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील कव्हा या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुलाचा प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित होता. १५ ऑगस्ट २००८ रोजी कव्हा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन क्रीडा संकुलासाठी मोफत जमीन दिली होती. २९ ऑक्टोबर २०१३ रोजी ८ हेक्टर ७९ आर जमिनीचा ताबा विभागीय संचालक, क्रीडा व युवक सेवा विभाग यांना देण्यात आला होता. २०२१ साली शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यासाठी न्यायालयात लढा उभारून हे क्रीडा संकुल कव्हा या ठिकाणीच व्हावे असा आदेश न्यायालयाकडून मिळवला होता. सदर क्रीडा संकुल मंजूर होऊनही अद्याप या कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू न झाल्याने कामाचा श्रीगणेशा होत नव्हता.

सदर प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी मागणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे शिवेंद्रसिंह भोसलेजी यांची भेट घेऊन मागणी केली होती. ३१ जानेवारी २०२४ रोजी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी घेतलेल्या बैठकीत या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व उपलब्ध निधीच्या अनुषंगाने क्रीडा सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आजमितीस या कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत शासकीय अध्यादेश निघाला असून सर्वांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याचे मनोमन समाधान वाटते. कोटेशन स्वीकृत करण्याचा कालावधी १० जून ते १७ जून असून या काळात ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून कोटेशन सादर करणे आहेत.

यामुळे सदर कामास वेग येणार असून लवकरच या कामाचा शुभारंभ होईल, असा विश्वास वाटतो. या क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यासाठी तत्परतेने पुढाकार घेणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, तसेच तत्कालीन क्रीडा मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन, तत्कालीन क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या क्रीडा संकुलासाठी सर्व स्तरांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे समस्त लातूरकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.

यासोबतच माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश आप्पा कराड व जिल्ह्यातील सर्व नेते यांचे देखील धन्यवाद. अशा उपक्रमांमुळे लातूर जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील आणि आजवर शिक्षण क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारा ‘लातूर पॅटर्न’ आता लवकरच क्रीडा क्षेत्रातही पाहायला मिळेल, यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *