राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 21, 2025
  • 0
  • 49 Views
Spread the love

   
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर केंद्र समन्वयक अविनाश जाधव यांनी स्वागत व प्रस्ताविक भाषण केले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांनी उपस्थितांना योग दिनाचे महत्त्व सांगत पतंजली ऋषींनी सांगितलेल्या अष्टांग योग- यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी याविषयी सखोल माहिती दिली.

आसन प्रकारांमध्ये बसून, उभे, पाठीवर व पोटावर झोपून केली जाणारी आसने यांची ओळख करून दिली गेली. प्रत्येक प्रकारातील पद्मासन, वज्रासन, गोमुखासन, ताडासन, वृक्षासन, अर्ध चक्रासन, भुजंगासन, मकरासन, शलभासन, त्रिकोणासन, हलासन, सर्वांगासन यांसारख्या आसनांचे प्रात्यक्षिक व दोन-दोन आवर्तन घेतले गेले.

प्राणायाम मध्ये अनुलोम-विलोम, भ्रामरी, शीतली, शितकारी तर हास्य योगाच्या फ्लॉवर हास्य, अर्जुन हास्य, मर्कट हास्य व वारकरी हास्य प्रकारांची शास्त्रशुद्ध माहिती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.

माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात दररोज योगाभ्यास हा जीवनाचा अविभाज्य भाग असावा, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे समारोप व आभार प्रदर्शन विनायक थिटे यांनी केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका स्नेहल विशे, मुख्याध्यापक अमोल खरसंबळे, तसेच शिक्षक प्रदीप परदेशी, विनोद शेले, राजू राठोड, जय नगराळे, कावेरी मॅडम, दिपाली पडवळ, प्रणिता राऊळ, स्मिता नवाळे यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन सत्रांमध्ये झालेल्या या कार्यक्रमात इयत्ता सहावी ते आठवी (प्राथमिक) आणि नववी (माध्यमिक) मराठी व हिंदी माध्यमातील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *