
हेडिंग्ले : लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची अद्भुत कामगिरी सुरूच आहे. पहिल्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलने शानदार शतके साजरी केली. दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शानदार शतक झळकावून नवा इतिहास रचला.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऋषभ पंतने १४६ चेंडूत षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. कसोटीत तिसऱ्यांदा पंतने षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. मनोरंजक गोष्ट अशी आहे की तिन्ही वेळा त्याने इंग्लिश फिरकीपटूंच्या (आदिल रशीद, जो रूट आणि शोएब बशीर) चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे ७ वे शतक आहे. यासह, महेंद्रसिंग धोनीचा ११ वर्षे जुना विक्रम मोडला गेला आहे.
धोनीचा विक्रम मोडला
या शतकासह ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय विकेटकीपर-फलंदाज बनला आहे. पंतने धोनीला मागे टाकत ही मोठी कामगिरी केली आहे. २००५ ते २०१४ दरम्यान धोनीने विकेटकीपर-फलंदाज म्हणून ९० कसोटी सामन्यांमध्ये ६ शतके झळकावली. त्याच वेळी, ऋषभ पंतने फक्त ४४ कसोटी सामन्यांमध्ये ७ शतके झळकावण्याचा विक्रम रचला आहे. पंतचे इंग्लंडमधील हे तिसरे कसोटी शतक आहे. त्याच वेळी, हे त्याचे सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये ५ वे शतक आहे. यावरून पंतची बॅट परदेशी भूमीला शोभते हे दिसून येते.
सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय विकेटकीपर
ऋषभ पंत – ७
एमएस धोनी – ६
वृद्धिमान साहा – ३
फारुख इंजिनियर – २
बुद्धी कुंदरन – २
कसोटी क्रिकेटमध्ये विकेट कीपर-फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट याच्या नावावर आहे. त्याने ९६ कसोटी सामन्यांमध्ये १७ शतके झळकावली. अँडी फ्लॉवरने १२ आणि इंग्लंडच्या लेस एम्सने ८ शतके झळकावली. यानंतर, ५ यष्टिरक्षक-फलंदाजांनी ७ कसोटी शतके झळकावली आहेत.
कसोटीत सर्वाधिक शतकं झळकावणारे यष्टीरक्षक
अॅडम गिलख्रिस्ट – १७
अँडी फ्लॉवर – १२
लेस एम्स – ८
एबी डिव्हिलियर्स – ७
ऋषभ पंत – ७
मॅट प्रायर – ७
कुमार संगकारा – ७
बीजे वॉटलिंग – ७