जसप्रीत बुमराहने मोडला वसीम अक्रमचा विक्रम 

  • By admin
  • June 22, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आशियाई गोलंदाज ठरला
  
हेडिंग्ले ः भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात शानदार आणि घातक गोलंदाजी केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस बुमराहने तीन विकेट्स घेतल्या आणि मोठी कामगिरी केली.
जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज आहे आणि वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा नेता आहे. बुमराहने या सामन्याच्या पहिल्या डावात आपली ताकद दाखवली आहे आणि हा भारतीय वेगवान गोलंदाज ऑली पोप आणि बेन डकेट यांच्या भागीदारीत आपली छाप पाडण्यात यशस्वी झाला.

इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि जसप्रीत बुमराहने जॅक क्रॉलीला स्वस्तात बाद केले. त्यानंतर भारताने काही संधी गमावल्या ज्यामुळे इंग्लंडला सावरण्याची संधी मिळाली. भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या रवींद्र जडेजाने १५ धावांवर बेन डकेटचा झेल सोडला, ज्याचा या इंग्लिश फलंदाजाने पुरेपूर फायदा घेतला. डकेटने ऑली पोपसह दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावा जोडल्या. क्रॉली व्यतिरिक्त, बुमराहने डकेट आणि जो रूट यालाही बाद केले.

बूम-बूम बुमराहची प्रतिभा
इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत बुमराची भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि त्याने पहिल्या सामन्यात हे सिद्ध केले आहे. लीड्समध्ये बूम-बूम बुमराहची प्रतिभा पाहायला मिळाली आणि यासोबत त्याने मोठी कामगिरी केली. बुमराह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आशियाई गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने माजी पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रमला मागे टाकले आहे. बुमराहने आता सेना देशांमध्ये १४७ बळी घेतले आहेत, तर अक्रमने या देशांमध्ये १४६ बळी घेतले आहेत. त्याच वेळी, माजी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे १४१ बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा १३० बळींसह यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

सेना देशांत सर्वाधिक बळी घेणारे आशियाई गोलंदाज

जसप्रीत बुमराह १४७
वसीम अक्रम १४६
अनिल कुंबळे १४१
इशांत शर्मा १३०
मोहम्मद शमी १२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *