छत्रपती संभाजीनगर शहरात ऑलिम्पिक दिन जल्लोषात साजरा 

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

७०० खेळाडू, क्रीडा संघटकांचा सहभाग 

छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांच्या आयोजन करण्यात आले होते. ७०० खेळाडू, विद्यार्थी, क्रीडा संघटकांच्या सहभागाने ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा झाला. 

ऑलिंपिक दिनानिमित्त गजानन महाराज मंदिर चौक गारखेडा परिसर येथून विभागीय क्रीडा संकुल पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्री गजानन महाराज मंदिर चौकामध्ये मल्लखांब, योगा कराटे, स्केटिंग आदी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. 

जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, गोकुळ तांदळे, एकनाथ साळुंके, फुलचंद सलामपुरे, उदय डोंगरे, गोविंद शर्मा यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू नॅशनल गेम्स स्पर्धेतील व खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेतील खेळाडूंकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच रॅलीला ऑलिम्पिकचा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

छत्रपती संभाजी नगर शहरातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पदक विजेते यांच्या हस्ते मशाल रॅली विभागीय संकुलामध्ये स्थिरावली. या प्रसंगी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व गतवर्षी झालेल्या नॅशनल गेम्स व खेलो इंडिया युथ गेम्स मधील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

विभागीय क्रीडा संकुल येथे जिम्नॅस्टिक्स, तलवारबाजी व हॉकीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. रॅलीमध्ये ज्ञानप्रकाश विद्या मंदिर शाळा, शिशु विकास प्राथमिक शाळा, एसएफएस स्कूल, कलावती चव्हाण हायस्कूल, ज्ञानांकूर हायस्कूल आदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी व क्रीडा प्रबोधिनी व विविध क्रीडा संघटनेच्या खेळाडूंनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.

ऑलिम्पिक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक, क्रीडा संघटना यांना अण्णामृत, इस्कॉन यांच्या वतीने मोफत खिचडीचे वाटप करण्यात आले. रॅलीतील सर्व सहभागींना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे टोप्या देण्यात आल्या. तसेच नॅशनल गेम्स व खेलो इंडिया युथ गेम्स मधील विजयी व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक व क्रीडा संघटकांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य तथा छत्रपती संभाजीनगर विभागाचे समन्वयक प्रा उदय डोंगरे, गोविंद शर्मा, फुलचंद सलामपुरे, डॉ. मकरंद जोशी, गोकुळ तांदळे,  दीपक रुईकर, सतीश पाठक, माणिक राठोड, मुरलीधर राठोड, सुरेश मिरकर, विकास सुर्यवंशी, विनायक राऊत, भिकन आंबे, दिनेश वंजारे, महेश इंदापुरे, एकनाथ साळुंके, राहुल तांदळे, विनोद माने, सागर मगरे, शिल्पा मोरे, अभय देशमुख, लता कलवार, तुषार आहेर, पूनम नावगिरे, सुजाता गुल्हाने, सदानंद सवळे, सचिन पुरी, रेखा परदेशी, राम मायंदे , खंडू यादवराव, गणेश पळवदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *