
आमदार संजय खोडके यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक
अमरावती ः पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत अमरावतीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवली. या घवघवीत यशाबद्दल आमदार संजय खोडके यांनी छत्रपती स्क्वॉश अकादमीच्या खेळाडूंचे कौतुक केले आणि खेळाडूंना सन्मानित केले.
आमदार संजय खोडके यांनी खेळाडूंशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अंतिम लढतीचे महत्व अनन्यसाधारण आहे. केवळ खेळच नाही तर यातून जीवनमूल्यांचेही महत्व हे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. लढण्याची ताकद आणि ऊर्जा सदैव कायम ठेवा.. शून्यातूनही विश्व कसे निर्माण करता येते, त्याचवेळी हातात आलेले यश कसे हिरावलेही जाते, हे निसर्गाचे कालचक्र असले तरी त्याच राखेतून पुन्हा उभारी घेण्याचे धडेही कसे असतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती स्क्वॉश अकॅडमीच्या खेळाडूंनी संपादन केलेले सुयश आहे.
हार-जीत हा खेळाचा अविभाज्य घटक असला तरी प्रत्येक सामन्यातून खेळाडूंची मानसिकता किती नाजूक किंवा कणखर असते हे दिसून येते. गुणवत्ता, क्षमता आणि प्रतिभेसह पराकोटीचा संघर्ष पुढच्या पिढीतही आम्ही घेऊन आलो आहोत हे आपल्या अमरावतीकर खेळाडूंनी आज सिद्ध करून दाखवले आहे. त्यापेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे विचारांची प्रगल्भता आणि एकमेकांबद्दलचा आदर. विजयाचा नसलेला उन्माद आणि पराभवानंतरही पुन्हा उभारी घेण्याची मनोकामना हे चित्र सुखावणारे आहे. कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासह खिलाडीवृत्ती पण महत्वाची ठरते, असे आमदार संजय खोडके यांनी सांगितले.
राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेच यश संपादन करणारे सर्व खेळाडू अमरावतीतील विभागीय क्रीडा संकुल येथे नियमित सराव करीत असतात. छत्रपती स्क्वॉश अकॅडमीच्या मार्गदर्शनात हे खेळाडू दररोज प्रशिक्षण घेत आहेत. क्रीडा प्रशिक्षक गणेश तांबे, सुमित थोराथ, वैभव झोंबाडे यांच्या मार्गदर्शनात हे खेळाडू नियमितपणे सराव करीत असतात.
पुणे येथील स्पर्धेत माही निशांत, शंतनू कवटेकर, प्रशाब्दि वानखडे, आर्या ठाकरे वंश जाधव हे रौप्य पदकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच अंशुमन सोनोने, हर्षदीप आठवले, प्रशील ठाकरे, निर्भय महानकर, शाहू काळमेघ, आयुष कपिले या खेळाडूंनी १९ वर्षांखालील वयोगटात कांस्य पदक पटकाविले आहे. यासोबतच पुरुष संघात सचिन दिधाते, प्रकाश आरेकर, जय सरडे, भाऊसाहेब जाधव, महेश चव्हाण हे कांस्य पदकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच १७ वर्षे वयोगटातील प्रशील ठाकरे याने कांस्य पदक प्राप्त केले. महिला दुहेरी मध्ये संजीवनी सलामे हिने रौप्य पदकाची कमाई केली आहे.
या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करीत आमदार संजय खोडके यांनी त्यांना भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कामागिरीसाठी सुयश चिंतीले. यादरम्यान छत्रपती स्क्वॉश अकॅडमीच्या वतीने क्रीडा प्रशिक्षक गणेश तांबे यांनी सर्व खेळाडूंचा आमदार संजय खोडके यांच्याशी परिचय करून दिला. यासोबतच छत्रपती स्क्वॉश अकॅडमी द्वारे नवोदित खेळाडूंना केले जाणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती देऊन आजच्या घडीला सर्व खेळाडू आपल्या अमूल्य कामगिरीमुळे नेहमीच जिंकण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची माहिती देत आमदार संजय खोडके यांना अवगत केले.