
नागपूर ः क्रीडा विषयक वातावरण निर्माण करणे, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करणे आणि सर्वसामान्यांमध्ये खेळांविषयी जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने दरवर्षी २३ जून हा दिवस जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर व शहर कुस्तीगीर संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी दयाराम भोतमागे, रमेश खाडे, भीमराव ठाकरे, नागपूर जिल्हा हँडबॉल संघटनेचे सचिव सुनील भोतमांगे, नागपूर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष केतन ठाकरे, जिम्नॅस्टिक संघटनेचे दारवणकर, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी शेट्टई, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील सॉफ्टबॉल, हँडबॉल व जिम्नॅस्टिक या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या व सहभाग नोंदवलेल्या विशेष खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश खेळाडूंमध्ये संघ भावना आणि क्रीडा संस्कार रुजविणे हा असून अशा उपक्रमांमुळे सकारात्मक क्रीडा संस्कृतीला चालना मिळते, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी यावेळी केले.
या प्रसंगी जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमात विविध खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.