
पुणे ः महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने ऑलिम्पिक दिनानिमित्त क्रीडा लेखक व पत्रकार संजय दुधाणे यांचा गौरव करण्यात आला. नीरज चोप्रा पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि सर परशुराम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑलिम्पिक दिन समारंभात क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन संजय दुधाणे यांचा गौरव करण्यात आले. यावेळी ऑलिम्पिकपटू रेखा भिडे, मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार प्राप्त प्रदिप गंधे, शंकुतला खटावकर क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गतवर्षी ऑलिम्पिकमध्ये २ वेळा सुवर्णपदकाचा विक्रम करणाऱ्या नीरज चोप्राचे चरित्र संजय दुधाणे यांनी लिहिले होते. दुधाणे यांनी एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिंपिक स्पर्धेतील पदकविजेता हा नीरजचा प्रेरणादायी प्रवास शब्दरूप केला आहे. नीरजच्या दुहेरी ऑलिम्पिक यशाचे साक्षीदार असणाऱ्या दुधाणे यांनी मैदानातील वर्णन हे प्रत्यक्ष स्पर्धेची अनुभूती देणारे ठरले आहे. हे पुस्तक मराठीसह इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध झाले आहे. ऑलिंपिक कांस्य पदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्या हस्ते या चरित्राचे प्रकाशन झाले होते. २०२४ मधील पुस्तकासाठी संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय दुधाणे यांचा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने सन्मान केला.
प्रा संजय दुधाणे यांची ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, संत सीतामाई, संत गणोरेबाबा, मेजर ध्यानचंद, भारतरत्न सचिन तेंडुलकर, फ्लाईंग शीख मिल्खासिंग, सुपर मॉम मेरी कोम, गोल्डन बॉय नीरज ही चरित्रे आणि आशियाई स्पर्धा, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडापर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या, ऑलिम्पिक अमृतानुभव, खेळांचा राजा-फुटबॉल, भारताचे ऑलिम्पिक, भारतीय खेळ, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी ही क्रीडाविषयक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.