
पुणे ः महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गावात शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कर्तृत्ववान व्यक्तींचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२५ देऊन गौरव करण्यात आला त्यामध्ये पुण्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी पंच व प्रशिक्षक श्रीधरन तांबा मारी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार डॉक्टर मिलिंद ढमढेरे यांचा समावेश होता.
श्रीधरन हे साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी जागतिक हॉकी मालिकेमध्ये पंच म्हणून काम केले आहे. त्याखेरीज त्यांनी वरिष्ठ व कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद अखिल भारतीय निमंत्रित स्पर्धा, फेडरेशन चषक हॉकी स्पर्धा इत्यादी अनेक स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. विविध वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

मिलिंद ढमढेरे हे सन १९८० पासून क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत ‘ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी’ या विषयावर पीएचडी मिळविली असून त्यांना आजपर्यंत व्यंकप्पा बुरूड राष्ट्रीय क्रीडा पत्रकार, मणिभाई देसाई ट्रस्ट तर्फे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय क्रीडा पत्रकार, बी.पी झंवर स्मृती सर्वोत्कृष्ट क्रीडा पत्रकार, शिवरामपंत दामले स्मृती क्रीडा पत्रकार, रायझिंग स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. क्रीडा भारती संस्थेच्या राष्ट्रीय प्रचार समितीवरही ते कार्यरत असून पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये मानद व्याख्याते म्हणून काम करीत आहेत.
महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गावात शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कर्तृत्ववान व्यक्तींचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२५ भारतीय संविधानिक सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस अधीक्षक शामकांत शेडगे, सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सयाजीराव घाडगे व संयुक्त सचिव वंदना संकपाळ यांच्या हस्ते सातारा येथे नुकताच हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. प्रतिभा सुनील शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सचे संस्थापक संजय पारठे,सातारा येथील आंतरराष्ट्रीय योगपटू व निसर्ग उपचार तज्ञ उमा चौगुले, पुण्यातील समाजसेविका आम्रपाली मोहिते यांचा सत्कारार्थींमध्ये समावेश होता.