
नवव्या क्रमांकावर हरवंश पंगालियाची स्फोटक शतकी खेळी
लंडन ः एकीकडे, भारतीय कसोटी संघाला लीड्समध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, भारतीय अंडर-१९ संघाने इंग्लंडमध्ये चमत्कार केला. २४ जून रोजी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारतीय अंडर-१९ संघाने यंग लायन्स इन्व्हिटेशनल इलेव्हन संघाचा २३१ धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून ४४२ धावांचा मोठा स्कोअर केला. प्रत्युत्तरादाखल, यंग लायन्स इन्व्हिटेशनल इलेव्हन संघ ४१.१ षटकांत फक्त २११ धावांवर गारद झाला.
१८ वर्षीय फलंदाज हरवंश पंगालियाने भारतीय संघाच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंगालियाने फक्त ५२ चेंडूत जलद शैलीत १०३ धावा फटकावल्या. त्यामध्ये ९ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. हरवंशच्या या वेगवान शतकाच्या बळावर, भारतीय संघाने ४४० पेक्षा जास्त धावा स्कोअरबोर्डवर टाकल्या.
टॉप ऑर्डरने निराशा केली
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. आयपीएल २०२५ मधून प्रसिद्धीझोतात आलेला आयुष म्हात्रे १ आणि वैभव सूर्यवंशी १७ धावा करून बाद झाला. त्यानंतर विहान मल्होत्रा, मौल्यराज सिंग चावडा आणि अभिज्ञान कुंडू हेही स्वस्तात बाद झाले. परिस्थिती इतकी बिकट झाली की अर्धा संघ ९१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर राहुल कुमार आणि कनिष्क चौहान यांच्यात १४० धावांची शानदार भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली.
हरवंशचे वडील ट्रक चालवतात
राहुल कुमारने ७३ धावा आणि कनिष्क चौहानने ७९ धावा केल्या. दोघांनाही बाद केल्यानंतर, अम्ब्रीश (७२) आणि हरवंशने मिळून खालच्या ऑर्डरमध्ये शानदार कामगिरी केली आणि संघाला डोंगराएवढ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारतीय संघाच्या विजयाचा नायक असलेल्या हरवंशबद्दल बोलायचे झाले तर, तो गुजरातमधील कच्छ रणात वसलेल्या गांधीधाम या छोट्याशा गावाचा आहे. त्याने श्री. नकुल अयाची यांच्या मार्गदर्शनाखाली नीलकंठ क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. हरवंशचे कुटुंब आता कॅनडामध्ये राहते, जिथे त्याचे वडील ब्रॅम्प्टनमध्ये ट्रक चालवतात.