राज्य कॅरम स्पर्धेत राहुल, समृद्धीला विजेतेपद

  • By admin
  • June 26, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

मुंबई ः श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे कै अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत राहुल सोलंकी आणि समृद्धी घाडीगावकर यांनी विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात मुंबईच्या राहुल सोलंकीने ठाण्याच्या झैद अहमदला २१-१७, २१-५ सरळ दोन सेटमध्ये हरवून एकतर्फी विजय नोंदविला आणि विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणने मुंबईच्या विकास धारियाला नमविले.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर बाजी मारली. तिने मुंबईच्या अंबिका हरिथवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात २०-२५, १६-८, २५-१० असा विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर सहज मात केली.

प्रमुख पाहुणे कुरुंदवाडचे पोलिस निरीक्षक रविराज फडणीस आणि नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थचे अध्यक्ष वैभव पुजारी यांच्या हस्ते विजेत्यांना रोख बक्षिसे, चषक व प्रशस्तिपत्रे देण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, कोल्हापूर जिल्हा हौशी असोसिएशनचे सचिव विजय जाधव, श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्ट स्पर्धेचे मुख्य आयोजक हर्षद पुजारी तसेच भालचंद्र पुजारी, अवधूत पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *