
सोलापूर ः सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १४ वर्षांखालील जे टी कुलकर्णी स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेत एन जी क्रिकेट अकादमी संघाने भंडारी क्रिकेट क्लबचा तब्बल १४९ धावांनी पराभव केला.
भंडारी मैदान येथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये एन जी क्रिकेट अकादमीने भंडारी क्रिकेट क्लबचा १४९ धावांनी पराभव केला. ही स्पर्धा शांभवी कन्स्ट्रक्शन्स यांनी पुरस्कृत केली आहे. एन जी क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४० षटकात तीन गडी बाद २४४ धावा केल्या. आनंद शेंडे याने स्पर्धेतील पहिले शतक ठोकत १०६ धावा केल्या. त्याला रणबिर सिंह बोंबरा याने ५७ धावा व आर्यन हंगे याने नाबाद ३१ धावा करून साथ दिली. भंडारी स्पोर्ट्स संघाकडून सक्षम राठोड ५३ धावात एक बळी, शार्दुल कुलकर्णी ४७ धावात एक बळी व राज सांगळे याने २७ धावात एक बळी घेतला.
२४४ धावांचा पाठलाग करताना भंडारी स्पोर्ट्स क्लबचा संघ २४ षटकात ९५ धावा करून बाद झाला. भंडारी स्पोर्ट्स क्लबकडून नदाफ ३३ धावा व अभिषेक सुरवसे याने नाबाद १८ धावा केल्या. एन जी क्रिकेट क्लबकडून अथर्व पाटील २९ धावांत चार बळी, कबीर कीर्तीकर १९ धावांत तीन बळी, अनुज वाल्मिकी ११ धावांत दोन बळी व ऋग्वेद पाटील याने २४ धावात एक बळी घेतला. सामनावीर पुरस्कार स्पर्धेतील पहिले शतक झळकावणारा आनंद शेंडे याला देण्यात आला.