
ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर १५९ धावांनी विजय
बार्बाडोस ः पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिज संघाचा १५९ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयाने ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन चक्रात आघाडी मिळवली आहे. वेगवान गोलंदाजांनी गाजवलेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान व घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिज संघ टिकाव धरू शकला नाही.
ऑस्ट्रेलियन संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना केन्सिंग्टन ओव्हल बार्बाडोस येथे खेळला गेला. ऑस्ट्रेलियन संघाने १५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, त्यांनी प्रथम ऑस्ट्रेलियाला १८० धावांवर बाद केले. प्रत्युत्तरात, विंडीज संघाने १९० धावा केल्या आणि १० धावांची आघाडी घेतली. परंतु दुसऱ्या डावात, कांगारूंनी ३१० धावा केल्या आणि यजमान संघासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला फक्त १४१ धावा करता आल्या. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा हा पहिला सामना होता, जिथे त्यांनी या नवीन चक्राची सुरुवात विजयाने केली.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे दमदार पुनरागमन
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी निराशा केली पण दुसऱ्या डावात त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने ६१, ब्यू वेबस्टरने ६३ आणि अॅलेक्स कॅरीने ६५ धावा केल्या. दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा, कॅमेरॉन ग्रीन आणि जोश इंग्लिस यासारख्या संघाच्या टॉप ऑर्डर फलंदाजांनी चांगली सुरुवात केली पण ते त्याचे मोठ्या डावात रूपांतर करू शकले नाहीत. याशिवाय मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेझलवूड यांनीही फलंदाजीत योगदान दिले. या डावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३१० धावांचा टप्पा गाठला आणि यजमानांना विजयासाठी ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले.
वेस्ट इंडिजने एकाच सत्रात १० विकेट गमावल्या
वेस्ट इंडिजसाठी ३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नव्हते. चौथ्या डावात जेव्हा विंडीजचे फलंदाज धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आले तेव्हा सुरुवातीपासूनच त्यांच्यावर दबाव दिसून आला. ४ धावांवर असताना संघाला मोठा धक्का बसला, जेव्हा क्रेग ब्रेथवेट ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, विंडीज संघाचे नियमित अंतराने विकेट्स पडत राहिले आणि संपूर्ण संघ १४१ धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिज संघाने तिसऱ्या सत्रातच सर्व १० विकेट्स गमावल्या. ट्रॅव्हिस हेड याने सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावले आणि त्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.