मिस्टर एशिया स्पर्धेत मनोज बोचरेने पटकावले कांस्य पदक

  • By admin
  • June 28, 2025
  • 0
  • 84 Views
Spread the love

जुन्नर ः दुबई येथे नुकत्याच झालेल्या मिस्टर एशिया बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मनोज शंकर बोचरे याने भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्य पदक पटकावले. यामुळे देशाचे तसेच पोलिस दल व शिवजन्मभूमी जुन्नरचे नाव आशियाई पातळीवर झळकले आहे. 

मनोज बोचरे हे मूळ गाव कुसूर (ता. जुन्नर) येथील असून ते मुंबई पोलिस दलात २००५ पासून कार्यरत आहेत. विराज सरमळकर त्यांचे प्रशिक्षक व मार्गदर्शक आहेत. बोचरे यांनी नवोदित श्री २०१०, मुंबई श्री २०१२ स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब मिळवला आहे. तसेच महाराष्ट्र श्री २०१५ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.

पोलिस दलात कार्यरत असताना मनसे नेते राज ठाकरे, अभिनेता अक्षय कुमार यांचे शरीररक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांचे शरीररक्षक म्हणून कार्यरत आहेत. दुबई येथील स्पर्धेसाठी बोचरे यांना अंबानी परिवाराचे सहकार्य लाभले आहे. बॉडी बिल्डिंग क्षेत्रात बोचरे यांनी २००८ मध्ये पाऊल टाकले. पोलिस दलातील नोकरी व बॉडी बिल्डिंगचा छंद या दोघांचे संतुलन सांभाळत बोचरे यांनी विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे. 

मुंबई येथे सदर स्पर्धेसाठी निवड चाचणी झाली त्यावेळी बोचरे यांनी आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली होती. या स्पर्धेसाठी तीन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. दुबई येथे १४ ते १८ जून या काळात ही स्पर्धा पार पडली. बोचरे यांचे शालेय शिक्षण घाटकोपर-मुंबई येथे झाले. लहानपणापासून खेळाची आवड होती. शिस्त, सातत्य आणि दृढनिश्चयाने ध्येय साध्य करता येते हे बोचरे यांनी कांस्यपदक पटकावून दाखवून दिले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *