
ब्रिगेडियर विरेंद्र सिंग यांचे खेळाडूंना मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा रायफल असोसिएशन आणि ३६ मराठा मेडियम रेजिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेला शनिवारी थाटात प्रारंभ झाला.
३६ मराठा मेडियम रेजिमेंटने उभारलेल्या शुटिंग रेंजमध्ये ही स्पर्धा होत आहे. ९७ आर्टीलरी ब्रिगेड शुटिंग नोड शुटिंग रेंजवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण १०० नेमबाजांनी सहभाग घेतला आहे.
या प्रसंगी ब्रिगेडियर विरेंद्र सिंग यांनी खेळाडूंशी संवाद साधत मार्गदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन ३६ मराठा मेडियम रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर संदीप थापलियर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा नेमबाजी संघटनेचे मनीष धूत, अनंत बर्वे, उमेश पटवर्धन तसेच ३६ मराठा मेडियम रेजिमेंटचे मेजर अक्षय शर्मा, मेजर अभय यादव, सुभेदार दत्तू पाखरे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच हेमंत मोरे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संग्राम देशमुख, गणेश हिवाळे, डॉ अस्मा परवीन सय्यद, अर्चना गाडेकर, नायब सुभेदार श्रीपती टाकळे, नायब सुभेदार पी एम पाटील, अखिलेश यादव, दिगंबर गिते, सागर निमसे आदी परिश्रम घेत आहेत.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींच्या गटात पिस्तूल प्रकारात श्रद्धा विजय ताले, मुलांच्या गटात जसविंदर सिंग यांनी आघाडी घेतली आहे. रायफल प्रकारात रोहन जाधव, सिद्धांत सोनवणे, मुलींच्या गटात राधिका सोनवणे आघाडीवर आहे.