महाराष्ट्र टेनिस व्हॉलिबॉल संघाची शानदार कामगिरी 

  • By admin
  • June 29, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक, एक रौप्य आणि कांस्यपदक पटकावले 

परभणी ः टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया मान्यतेने छत्तीसगड टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटापारा येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सबज्युनिअर मुले व मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक तर ज्युनिअर मिश्र दुहेरी गटात रौप्यपदक व मुले गटात कांस्यपदक पटकावले.

सब ज्युनिअर मुले गटात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने गुजरात संघाचा २-० असा पराभव करुन सुवर्णपदक प्राप्त केले. सब ज्युनिअर मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात कर्नाटक संघावर २-० असा विजय साकारत सुवर्णपदक पटकावले. ज्युनियर मिश्र दुहेरी गटात अंतिम सामना महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यात झाला. या लढतीत दिल्लीने २-० असा विजय नोंदवत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. ‌

ज्युनियर मुलांच्या गटात तृतीय क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि केरळ असा सामना झाला. यात महाराष्ट्र संघाने २-० असा विजय नोंदवला व तिसरा क्रमांक संपादन केला. सब-ज्युनिअर गटात सुवर्णपदक पटकावलेल्या संघात ईश्वर मोरे, दिव्यांशु चांद, वेदांत महामाने, गौरव चौधरी, मयूर निकम, वीर पाटील यांचा समावेश होता. सब- ज्युनिअर मिश्र दुहेरी गटात राजवीर भोसले व सोनाक्षी कदम यांनी सुवर्णपदक जिंकले. ज्युनिअर मिश्र दुहेरी गटात शिवम कदम व श्रेया धावन यांनी रौप्यपदक संपादन केले. ज्युनिअर मुलांच्या गटात कांस्यपदक विजेता संघात कृष्णा अहिरे, विवेक साळुंखे, प्रसाद महाले, मयूर बोरसे, प्रताप पौळ, अनंत धापसे यांचा समावेश आहे. 

महाराष्ट्र राज्य संघास प्रशिक्षक म्हणून निलेश माळवे, उज्वला कदम, गणेश आम्ले, शिवदास खुपसे यांनी काम पाहिले. या घवघवीत यशाबद्दल डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, सरचिटणीस गणेश माळवे, उपाध्यक्ष आनंद खरे, रामेश्वर कोरडे, किशोर चौधरी, कोषाध्यक्ष डॉ दिनेश शिगारम, विभागीय सचिव अशोक शिंदे, वैभव शिंदे, आशिष ओबेरॉय यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *