
नवी दिल्ली ः युवा भारतीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी यांनी शानदार कामगिरी करत यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारताची १६ वर्षीय बिगरमानांकित खेळाडू तन्वीने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत युक्रेनच्या सातव्या मानांकित पोलिना बुहारोवाला ३४ मिनिटांत २१-१४, २१-१६ असे हरवून जेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवले.
युक्रेनियन खेळाडूविरुद्ध तन्वीचा हा कारकिर्दीतील दुसरा विजय होता. अंतिम फेरीत तन्वीचा सामना अमेरिकेच्या अव्वल मानांकित बेईवेन झांगशी होईल. पुरुष एकेरीत, भारताच्या चौथ्या मानांकित आयुषने अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनला २१-२३, २१-१५, २१-१४ असे पराभूत करून मोठा धक्का दिला. आता आयुषचा सामना कॅनडाच्या तिसऱ्या मानांकित ब्रायन यांगशी होईल. यांगने चायनीज तैपेईच्या लियाओ झुओ-फूचा २१-१०, २१-१२ असा पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीत, तन्वीने उच्च मानांकित मलेशियन खेळाडू करुपाथेवन लेत्शानाला २१-१३, २१-१६ असे हरवले, तर आयुषने चायनीज तैपेईच्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन कुओ कुआन लिनचा २२-२०, २१-९ असा पराभव केला.