
बर्मिंगहॅम ः बुधवारी जेव्हा भारतीय संघ पुन्हा एकदा बर्मिंगहॅमच्या मैदानावर प्रवेश करेल तेव्हा सर्वांच्या नजरा यशस्वी जैस्वालवर असतील. जैस्वालला कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा संघ खूप आवडतो, गेल्या सामन्यातही जैस्वाल याने शतक झळकावले होते, परंतु त्याच्या शतकामुळे संघाच्या विजयात काही फायदा झाला नाही. दरम्यान, जर पुढच्या सामन्यात यशस्वी जैस्वालची बॅट चांगली चालली तर तो महान फलंदाजांपैकी एक असलेल्या डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडेल.
यशस्वी जैस्वालने आतापर्यंत २० कसोटी सामन्यांच्या ३८ डावात १९०३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर पाच शतके आणि १० अर्धशतके आहेत. त्याची सरासरी ५२ च्या जवळपास आहे. त्याने केलेल्या १९०३ धावांपैकी ८१७ धावा जैस्वालने फक्त इंग्लंडविरुद्ध केल्या आहेत. त्याने या संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. आता जैस्वालला पुढच्याच कसोटीत इंग्लिश संघाविरुद्ध १००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटीत १००० धावा पूर्ण करणार
जैस्वालला इंग्लंडविरुद्ध १००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी आणखी १८३ धावा करायच्या आहेत. इंग्लंडविरुद्ध कसोटीत एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. जो अद्याप मोडलेला नाही. डॉन ब्रॅडमनने इंग्लंडविरुद्ध एक हजार कसोटी धावा करण्यासाठी फक्त १३ डाव घेतले होते.
जैस्वालसमोर सुवर्णसंधी
जैस्वालने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध ११ कसोटी डाव खेळले आहेत. म्हणजेच, जर जैस्वालने पुढच्या सामन्याच्या पहिल्या डावात आवश्यक धावा केल्या तर तो ब्रॅडमनचा विक्रम मोडेल. पण जर जैस्वालने पहिल्या आणि दुसऱ्या डावात एकत्रितपणे या १८३ धावा केल्या तर हा त्याचा १३ वा डाव असेल. याचा अर्थ तो डॉन ब्रॅडमनला मागे टाकू शकणार नाही, पण तो निश्चितच त्यांची बरोबरी करेल.