
जळगावच्या रोहित नवले व देवेश पाटील यांना सुवर्णपदक
जळगाव ः भारतीय आट्यापाट्या महामंडळाच्या वतीने हासीमरा पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात बांगलादेशचा २-० सेटने पराभव करीत दुसऱ्यांदा आशिया कप जिंकला.
या स्पर्धेत जळगावच्या रोहित नवले व देवेश पाटील यांनी भारतीय संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करून संघास विजेतेपद प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील रोहित व देवेश यांनी आशियाई आट्यापाट्या स्पर्धेमध्ये घेतलेल्या सुवर्ण भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दोघेही खेळाडू सिद्धिविनायक विद्यालयात सुरू असलेल्या आट्यापाट्या प्रशिक्षण केंद्र केंद्राचे खेळाडू आहेत.
भंगाळे गोल्डचे संचालक व शहरातील नामवंत उद्योजक भागवत भंगाळे यांच्या हस्ते दोघाही सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत सोनवणे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आणि जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, बन्सी आप्पा माळी, खेळाडूंचे प्रशिक्षक अनिल माकडे हे उपस्थित होते.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेच्या कार्याध्यक्ष डॉ अमृताताई सोनवणे, सिद्धिविनायक फाउंडेशनचे संचालक डॉ गौरव सोनवणे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त विजय न्हावी, विशाल फिरके, अॅड अक्षय टेमकर यांनी केले आहे.