मुंबई ः नागरिक सहाय्य केंद्र, आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे कबड्डी दिनाचे औचित्य साधून ११ ते १५ जुलै दरम्यान इनडोअर शालेय पाच-पाच चढायांची विनाशुल्क कबड्डी स्पर्धा वडाळा-पश्चिम येथील ज्ञानेश्वर विद्यालय सभागृहामध्ये मॅटवर आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्या शालेय कबड्डी संघाना आकर्षक पुरस्कार तसेच वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे प्रमुख अश्विनीकुमार मोरे यांनी दिली.
गतवर्षी शालेय कबड्डी संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे यंदाही १६ वर्षाखालील शालेय मुलांच्या सहभागाने पाच-पाच चढायांची दोन डावात कबड्डी स्पर्धा बाद पद्धतीने होणार आहे. डीएसओ कबड्डी स्पर्धेत खेळणाऱ्या शालेय कबड्डी संघाना स्पर्धात्मक सराव मिळण्याचा उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धा प्रसंगी राष्ट्रीय ख्यातीचे कबड्डी प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी, प्रशिक्षक एकनाथ सणस तसेच माजी क्रीडापटू गोविंदराव मोहिते आदींचे मार्गदर्शन देखील लाभणार आहे. पूर्णपणे मोफत असलेल्या उपक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय कबड्डी संघानी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर (८६५२० ५८८९८) यांच्याकडे २७ जूनपर्यंत संर्पक साधावा.