
ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहाची नियोजन भवनात उत्साहात सांगता
नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील खेळाडूंची क्रीडा विषयक रुची, आवड तसेच क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक प्राप्त होत असलेले यश पाहता नांदेड येथे अद्ययावत विभागीय क्रीडा संकुलाची गरज आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवनात ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहाची सांगता झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. ऑलिम्पिक सप्ताह सांगता कार्यक्रमाला नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर, माजी आमदार तथा भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपीले, प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेबरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ दीपक बच्चेवार, कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी, अध्यक्ष अवतारसिंग रामगडीया, महासचिव डॉ राहुल वाघमारे, डॉ हंसराज वैद्य, बालाजी जोगदंड, जयपाल रेड्डी यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाचा प्रारंभ विनेश्री गडगिळे हिच्या स्वागत गीताने झाला. या कार्यक्रमात नांदेड भूषण क्रीडा संघटक पुरस्कार डॉ हंसराज वैद्य यांना रोख दहा हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन तसेच नांदेड भूषण क्रीडा मार्गदर्शक डॉ. राहुलसिंह चंदेल व दुर्गेश सूर्यवंशी यांना विभागून तर नांदेड भूषण क्रीडा गुणवंत खेळाडू सृष्टी जोगदंड आणि किरण नागरे यांना विभागून देण्यात आला. त्यासोबतच विविध संघटनेच्या नांदेड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी व राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक यश संपादन केलेल्या जवळपास १५० राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानपत्र, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक माजी संचालक डॉ विठ्ठलसिंह परिहार, बालाजी जाधव, डॉ जुजारसिंग शिलेदार, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी किशोर पाठक, विलास नागेश्वर यांचाही यावेळी सन्मान गौरव करण्यात आला.
नांदेड शहर आणि जिल्हाभरामध्ये विविध क्रीडा संघटना आणि ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड यांच्या वतीने ठिकठिकाणी क्रीडा विषयक कार्यक्रम घेतले. आमदार बोंढारकर व माजी आमदार, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी नांदेड येथे अद्ययावत विभागीय क्रीडा संकुल उभारणीसाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका गायकवाड यांनी केले. बालाजी जोगदंड यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष विक्रांत खेडकर, डॉ रमेश नांदेडकर, कळमसे, विनोद गोस्वामी, सहसचिव वृषाली जोगदंड, डॉ दिनकर हंबर्डे, विनोद जमदाडे, बाबुराव कंधारे, राष्ट्रपाल नरवाडे, ज्ञानेश्वर सोनसाळे, शिवाजी जाधव, आकाश मुंगल, सुभाष कुरे, संतोष मिटकर, वैजनाथ नावदे, कन्हेय्या खानसोळे, प्रसेनजीत जाधव, आशा भरकट, कोमल गड्डमवाड, रामा जाधव, नेहा गडगे यांनी परीश्रम घेतले.