पहिली जळगाव कॅरम लीग मकरा चॅलेंजर्स संघाने जिंकली

  • By admin
  • July 1, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

जळगाव ः जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड प्रायोजित पहिल्या जळगाव कॅरम लीग स्पर्धेत मकरा चॅलेंजर्स संघाने विजेतेपद पटकावले.

कांताई सभागृह येथे ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. मकरा चॅलेंजर्स संघाचे मालक यूसूफ मकरा, आयकॉन खेळाडू सय्यद मोहसीन यांना पंधरा हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. अप्पासाहेब लॅजेंटस हा संघ उपविजेता ठरला. त्यांचे संघ मालक अॅड रवींद्र कुलकर्णी व आयकॉन खेळाडू योगेश धोंगडे यांना दहा हजार व चषक देऊन सन्मानित केले. तृतीय क्रमांक नशिराबाद लॉयन्स यांनी पटकावला.

या प्रसंगी जैन इरिगेशन स्पोर्ट्स विभागाचे अरविंद देशपांडे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, सर्व संघ मालक सुपडू चौधरी, श्रीकांत पाटील, रेहान सालार, अॅड रवींद्र कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून संदीप दिवे याला सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ टीम म्हणून नशिराबाद लॉयन्सला गौरविण्यात आले. टायल्स स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल जैन इरिगेशनच्या चषक देऊन विशेष गौरव करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील एका संघात पाच खेळाडू असे सहा संघ मिळून ३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यासाठी प्रमुख पंच म्हणून पुणे येथील रहिम खान, झोहेब खाटीक-धुळे यांनी काम पाहिले. प्रत्येकी पाच सामने सांघिक झाले. प्रत्येक सामान्यात दोन एकेरी आणि दुहेरी सामने साखळीपद्धती खेळविण्यात आले. सर्व सामने हे चुरशीचे झाले यात चार संघाचे गुण समान होते. त्यामध्ये दोन संघ स्पर्धेतून साखळी सामन्यातील विजयी आणि पराभूत सामन्यांच्या आधारे बाहेर झाले. यामध्ये सालार किंग ८ गुणांसह उपांत्य फेरीत दाखल झाले त्यांच्या सोबत नशिराबाद लायन्स ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावरून दाखल झाले.

मकरा चॅलेंजर्स आणि अप्पासाहेब लॅजेंटस यांनी अनुक्रमे तीसरे व चौथे स्थान पटकावून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या प्रथम सामन्यात सालार किंग विरूद्ध अप्पासाहेब लॅजेंटस यांच्यातील सामन्यांमध्ये अप्पासाहेब लॅजेंटस् यांनी २-१ ने विजयीश्री खेचून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नशिराबाद लॉयन्स विरूद्ध मकरा चॅलेंजर्स यांच्यात लढत झाली. त्यात मकरा चॅलेंजर्स (२-१) यांनी विजय प्राप्त केला. अंतिम सामना अप्पासाहेब लॅजेंटस विरूद्ध मकरा चॅलेंजर्स यांच्यात रंगला. त्यांच्यात मकरा चॅलेंजर्स (२-१) विजयी झाले.

अतितटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम दोन गेम मध्ये बरोबरी झाल्यानंतर सय्यद मोहसीन यांनी तिसऱ्या गेममध्ये निर्णायक विजय मिळवित या पहिल्या कॅरम लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विजयी व उपविजयी संघाच्या खेळाडूंचे कौतुक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले आहे. सूत्रसंचालन गणेश लोडते यांनी केले. यशस्वीतेसाठी सय्यद मोहसीन, मोहम्मद फजल, हबीब शेख यांच्या जैन स्पोर्ट्स अॅकडमीच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *