
२०१५ पूर्वी भुसावळ तालुक्याती बुद्धिबळ खेळाला जास्त वाव नव्हता. इतर खेळांच्या तुलनेत बुद्धिबळ स्पर्धेसाठी फार अशा काही संधी नव्हत्या. आजुबाजूच्या शहरात बुद्धिबळ खेळाचा प्रसार वाढू लागला होता. म्हणून भुसावळ मध्ये देखील बुद्धिबळ खेळाडू घडले पाहिजेत, स्पर्धेच्या संधी वाढल्या पाहिजेत या उद्देशाने द जिनियस चेस अकॅडमीची स्थापना श्रेयस अवतारे (जैन) यांनी केली.
द जिनियर चेस अकॅडमीची सुरुवात करुन श्रेयस अवतारे (जैन) यांनी भुसावळच्या बुद्धिबळ इतिहासाला एक नवीन आयाम दिला. अकादमी सुरू केल्यानंतर प्रारंभीच्या काळात दहा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात आले. हे खेळाडू नंतर स्पर्धेमध्ये सहभागी होत गेले. त्यांच्या सातत्याने सहभागाने आणि यशामुळे मुलांमध्ये बुद्धिबळ खेळाचे आकर्षण वाढत गेले. जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजयी झाल्यानंतर त्यांच्या कौतुकासह बुद्धिबळ खेळाचा प्रचार वाढत गेला.
बुद्धिबळ खेळासाठी खेळाडू उत्सुक होत गेले, खेळाबद्दल आतुरता वाढू लागली. त्यानंतर श्रेयस अवतारे (जैन) यांनी २०१७ मध्ये प्रथम नवकार चषक स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये एकूण ११० खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन खेळाडूंचा देखील सहभाग होता. जळगाव, अमळनेर, धुळे, नाशिक, शेगाव, अमरावती, पाचोरा अशा शहरांमधून खेळाडू सहभागी झाले होते आणि द जिनियस चेस अकॅडमी मधील खेळाडूंच्या घवघवीत यशासोबत स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.
या स्पर्धेनंतर बुद्धिबळाचा खेळाडूंमधील प्रचार व उत्सुकता वेगळ्या उंचीवर पोहोचली होती. बुद्धिबळ खेळाविषयी आतुरता वाढू लागली. बरेच खेळाडू अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेऊ लागले. त्यानंतर अनेक स्पर्धा भुसावळ मध्ये झाल्या. २०१५ पासून बुद्धिबळ प्रसार व प्रचाराचा वेग कायम आहे. यंदाच्या वर्षापर्यंत ५०० प्लस खेळाडूंना श्रेयस अवतारे (जैन) यांनी प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय मानांकन खेळाडू घडले आहेत हे विशेष.
सध्याच्या स्थितीत भुसावळ मध्ये उत्तम दर्जाचे आतंरराष्ट्रीय फिडे मानांकन खेळाडू आहेत. आर्थिक परिस्थिती नसलेल्या मुलांना श्रेयस अवतारे (जैन) हे मोफत प्रशिक्षण देतात हे विशेष. गेल्या वर्षी श्रेयस अवतारे (जैन) यांना उत्कृष्ट कोच व बुद्धिबळ खेळाडू घडवण्याच्या अथक प्रयत्नांसाठी क्रीडा भारती संघटना यांच्याकडून आणि भुसावळच्या आमदारांच्या हस्ते सन्मान पत्र देवून गौरवण्यात आले.