
नांदेड ः ऑलिम्पिक मान्यताप्राप्त भारतासह सर्व देशातील संरक्षण दलाला शिकविण्यात येणारा सर्व शाळांमध्ये खेळ म्हणून खेळला जाणारा तायक्वांदो हा खेळ स्वसंरक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याने शाळा तिथे तायक्वांदो प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिकविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी लाभ घेण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक तथा जिल्हा संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगाने विकास करणारा तायक्वांदो हा खेळ स्वसंरक्षणासह, स्वशिस्त, शिष्टाचार, देशप्रेम, ध्यान, साधना, नोकरीत आरक्षण या सर्वच बाबी मिळवून देणारा असून संघटनेसह महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये सीबीएससी आयसीएससी, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयामध्ये तायक्वांदो खेळाचा समावेश आहे. तरीही ग्रामीण भागात अजूनही त्याचा म्हणावा तेवढा प्रचार प्रसार न झाल्याने ग्रामीण भागातील शाळांमधील खेळाडू या खेळापासून वंचित आहेत.
त्यामुळे नुकत्याच झालेल्या जिल्ह्याच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये शाळा तिथे तायक्वांदो प्रशिक्षण हा अभिनव उपक्रम प्रशिक्षक ऋषिकेश टाक, विनोद दाढे, राष्ट्रपाल नरवाडे, ओमप्रकाश आळणी, शुभांगी देशमुख, वैभव सुगावे, अमोल भालेराव, पृथ्वीराज राठोड, संदेश जाधव, सोनी बिर्जे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून भारतीय खेळ महासंघाने सीबीएससी शाळेतील विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या स्पर्धेत खेळण्यास बंदी घातल्याने स्टेट बोर्डाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना सहजतेने राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेता स्तर गाठता येणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील शाळांनी मोठ्या प्रमाणात शाळा तिथे तायक्वांदो या योजनेचा लाभ करून घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी शाळांनी ७०२०८१५८२६ बालाजी पाटील जोगदंड, ८४२१८२२७२४ वरिष्ठ प्रशिक्षक ऋषिकेश टाक यांच्याशी संपर्क साधून शाळांसह ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, संस्थाचालक यांनीही याचा लाभ घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.