इनडोअर क्रिकेट स्पर्धेत ऑडिट आर्मीजला विजेतेपद

  • By admin
  • July 1, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

मुंबई ः एमजीए फाउंडेशनतर्फे मुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ऑडिट आर्मीज संघाने रिटर्न्स मेकर्स संघाचा १२ धावांनी पराभव करुन विजेतेपद पटकावले. 

ही स्पर्धा गोरेगाव (पश्चिम) येथे खेळली गेली. आघाडीची सल्लागार संस्था असलेल्या एमजीए ग्रुपतर्फे आयोजित दुसऱ्या टॅक्स प्रीमियर लीग स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. करसल्लागार, वित्त व कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणणाऱ्या या अनोख्या क्रिकेट स्पर्धेने खेळासोबतच नेटवर्किंगलाही नवा आयाम दिला. या स्पर्धेत देशभरातील नामांकित कंपन्यांमधील व्यावसायिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मैदानावर चुरशीच्या सामन्यांतून संघभावना, समन्वय व एकोप्याचे उत्तम दर्शन घडले. व्यावसायिक जगतातील सहकार्य आणि सुसंवादाचे महत्त्व या स्पर्धेद्वारे पुन्हा अधोरेखित केले.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑडिट आर्मीज संघाने रिटर्न्स मेकर्सवर ८९-७७ असा १२ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात ऑडिट आर्मीज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या फलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवत ८९ धावा करताना विजयाचा पाया मजबूत केला. या वेळी ऑडिट आर्मीजच्या पहिल्या जोडीने (कृष्णा समंत्रा १९ धावा १ षटकार व स्वप्निल शिंदे ८ धावा) २ षटकांत २७ धावा धावफलकावर लावल्या. तर दुसऱ्या जोडीने (सचिन कुंभार ९ धावा व नवीन सोमणी १५ धावा) २ षटकांत २५ धावा धावफलकावर लावल्या. तिसऱ्या जोडीने (मोहित कुमार १४ धावा केल्या त्यात त्याने एक षटकार सुद्धा खेचला व दिव्यांशु पटोडिया १० धावा केल्या पण ते दोघेही एक-एकदा बाद झाल्याने त्याच्या व संघाच्या धावसंखेतून ५, ५ एकूण १० धावा वजा झाल्या) २ षटकांत १४ धावा मिळवण्यात यशस्वी ठरले. तर चौथ्या व शेवटच्या जोडीने (शिवेंद्र द्विवेदी १० धावा व विनय डालमिया (१८ – ५ = १३ धावा)) २३ धावांची भर घालत संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

रिटर्न्स मेकर्सच्या पहिल्या जोडीने (गौरव अग्रवाल ११-५ = ६ धावा, १ विकेट व सुरेश नायर १७ धावा, एक षटकार) २३ धावा करून ऑडिट आर्मीजला जोरदार लढत देण्याचा इशारा दिला. दुसऱ्या जोडीने (हितेन रुघाणी ११ धावा व संस्कार शुक्ला ९-१५ = -६ धावा (३ वेळा बाद)) फटकेबाजी करण्याच्या नादात फक्त ५ धावा करण्यात यश मिळवल. तिसऱ्या जोडीने (चिंतन नाईक १७ धावा १ षटकार, २ विकेट व परिमल वाशी १२ धावा) २९ धावा काढत पुन्हा एकदा संघाला सुस्थित आणण्याचा प्रयत्न केला. तर चौथ्या व शेवटच्या जोडीला (गौरव रतन ८-१० = -२ धावा व सुधीर गुप्ता २२ धावा व दोन षटकार) फटकेबाजी करण्याच्या नादात २० धावाच करता आल्या. त्यामुळे रिटर्न्स मेकर्स संघाला १२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ अतिशय भव्य स्वरुपात पार पडला. त्यावेळी एमजीए ग्रुपचे सहसंस्थापक मनीष अग्रवाल व आणि स्नेहा पाटील, क्षितीज वेदक (संस्थापक चेअरमन, महाइनडोअर (महाराष्ट्र) क्रिकेट असोसिएशन), बाळासाहेब तोरसकर (संस्थापक सेक्रेटरी, महाइनडोअर (महाराष्ट्र) क्रिकेट असोसिएशन) उपस्थित    होते. मनीष अग्रवाल आणि स्नेहा पाटील म्हणाले, “टीपीएल २.० ही केवळ क्रिकेट स्पर्धा नव्हती, तर ती होती कौशल्य, संघभावना व अनुपालन समुदायाच्या आत्म्याचा उत्सव. जेव्हा सहकारी मैदानावर एकत्र येतात, तेव्हा ते व्यवसायातही अधिक सशक्त भागीदार होतात. पारंपरिक ऑफिसच्या चौकटीपलीकडे जाऊन अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी अशा व्यासपीठांची गरज आहे.” या उपक्रमाला महिमा अग्रवाल व ज्योतिका राय यांचा भक्कम पाठिंबा लाभला. त्यांनी संपूर्ण आयोजनात मोलाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *