के पी क्रिकेट अकॅडमी संघाला विजेतेपद

  • By admin
  • July 2, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

गुरू द्रोणाचार्य चषक क्रिकेट स्पर्धा

सोलापूर ः के पी क्रिकेट अकॅडमी संघाने गुरू द्रोणाचार्य चषक १७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. त्यांनी साऊथ सोलापूर आपटे ग्रुपचा सात गडी राखून पराभव केला.

के पी क्रिकेट अकॅडमी आणि डी एम क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत मास्टर, साउथ सोलापूर, आपटे ग्रुप, डी एम अकॅडमी व के पी अकॅडमी अशा चार संघांना निमंत्रित करून साखळी पद्धतीने स्पर्धा खेळवण्यात आली. त्यातून टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळविण्यात आला.

हरिभाई देवकरण क्रीडा संकुल येथे झालेल्या ४० षटकांच्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना साऊथ सोलापूरने ३२.५ षटकात सर्वबाद १८० धावा केल्या. के पी अकादमी संघाकडून कर्णधार यश मंगरुळे व आदित्य दडे याने प्रत्येकी तीन तर हुच्चेश्वर कांबळे याने दोन बळी टिपले. मयंक पात्रे व सुरेश लोणार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. १८१ धावांचे विजयी लक्ष्य के पी अकादमी संघाने केवळ १८ षटकांत ३ गडी गमावत गाठले. त्यात प्रथमेश लोंढेने ७९, आदित्य तमनूरने ४६ आणि आदित्य दडे याने नाबाद २९ धावांचे योगदान देऊन हा सामना एकतर्फी जिंकला.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण के पी क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष हणुमंत मोतीबने यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवा सिमेंटचे उद्योजक शिवा होसाळे, उद्योजक सुनील महाजनी, सामाजिक कार्यकर्ते सुनील चव्हाण, एच डी प्रशालेचे वरिष्ठ लिपिक रत्नाकर लोंढे, के पी अकादमीचे प्रशिक्षक प्रकाश कंपली यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे यांनी केले.

वैयक्तिक पारितोषिके

फलंदाज – आदित्य तमनूर (२२८ धावा), गोलंदाज – शौर्य राऊत (१० बळी), क्षेत्ररक्षक – सिद्धांत कांबळे (९ फलंदाजांना धावचित), सर्वोत्कृष्ट झेल – ओम चव्हाण, मालिकावीर – आदित्य दडे (१६६ धावा, ८ बळी). सामनावीर – यश मंगरुळे (३ बळी व २ झेल).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *