
गट शिक्षणाधिकारी चेतन कांबळे यांचा मेसा संघटनेतर्फे सत्कार
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा) संघटनेतर्फे पंचायत समिती कार्यालयाचे नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी चेतन कांबळे यांचा स्मृतिचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना मेसा संघटनेच्या पदाधिकाऱयांतर्फे विविध मागण्यांसंदर्भांत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात आरटीई नमुना नंबर २ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्व इंग्रजी शाळांचे आलेले प्रस्ताव तत्काळ तपासणी करून जिल्हा परिषद कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात यावे, त्याचप्रमाणे ज्या शाळांकडे अगोदरच आरटीई प्रमाणपत्र आहेत अशा शाळांना त्या आधारावर आरटीई प्रमाणपत्र देण्यात यावे, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अनाधिकृत शाळा तात्काळ बंद करण्यात येऊन दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी, शहरात, जिल्ह्यात व गावोगावी अनधिकृत इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. या अनधिकृत शाळा विद्यार्थ्यांचे व पालकांचे शैक्षणिक नुकसान व आर्थिक नुकसान करत आहे व विद्यार्थ्यांचे व पालकांचे फसवणूक करत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच आरटीई प्रतिपूर्तीसाठी राहिलेली प्रस्तावांची लवकरात लवकर तपासणी करून जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठविण्यात यावे, वर्धित मान्यतेसाठी येणाऱ्या प्रस्तावांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक विभाग यांना सकारात्मकपणे पाठविण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पंचायत समिती कार्यालयाचे गटशिक्षणाधिकारी चेतन कांबळे यांना मेसा संघटनेच्या पदाधिकारी यांनी इंग्रजी शाळांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. यावेळी गट शिक्षणाधिकारी चेतन कांबळे यांनी सांगितले की, आम्ही अनधिकृत इंग्रजी शाळांची तपासणी करून दोषी संस्था चालकांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मेसा संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
या वेळी मेसा संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा प्रवीण आव्हाळे, राज्य सरचिटणीस संदीप लघामे पाटील, राज्य उपाध्यक्ष नागेश जोशी, कोषाध्यक्ष डॉ संजय पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील मगर, पोपट खैरनार, जगदीश देसले, कैलास गायकवाड पाटील, प्रदीप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.