
नाशिक ः विद्यार्थी हे राष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका निभवणारी व्यक्ती असतात त्यामुळे विद्यार्थ्यांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील ग्रीन कॅम्पसला उदोजी होरायझन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. याप्रसंगी नाशिक येथील उदोजी होरायझन स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, उपकुलसचिव डॉ सुनील फुगारे, जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे, सहयोगी प्राध्यापक डॉ प्रदीप आवळे, प्रा प्रशांत शिवगुंडे, उदोजी होरायझन स्कूलचे अतुल हेडाव, लीना थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठ परिसरात पंचज्ञानेंद्रिये आधारित वृक्षांची लागवड करुन सेन्सरी गार्डन विकसित करण्यात आले आहे. पर्यावरण संतुलनासाठी विद्यापीठातर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. शरीराला झोप आवश्यक असते यासाठी मानसिक शांंतता मिळावी यासाठी प्रत्येकाने प्राणायम व योगअभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या नक्षत्र गार्डन, आरोग्य मानव, राशी गार्डन याबाबत माहिती दिली.
विद्यालयीन जीवन हे व्यक्तीच्या जीवनात शिक्षण, संस्कार व व्यक्तिमत्व विकासाठी अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, त्यांच्यामध्ये सामाजिक कौशल्य, नेतृत्वगुण आणि नैतिक मूल्ये विकसीत करणे देखील आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या जिवनातील महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी अध्ययनावर लक्ष केंद्रित करणे. शिक्षणामुळेच व्यक्तीला नवीन ज्ञान, कौशल्य आणि विचारधारा प्राप्त होतात. त्यांच्यात स्वप्न पाहण्याची आणि ते पुर्ण करण्याची प्रेरणा निर्माण होते. तसेच विद्यार्थ्यांनी नियमितता, चिकाटी आणि परिश्रम यांचा अवलंब करायला पाहिजे, जे पुढील आयुष्यात त्यांना यशस्वी बनवते असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ प्रदीप आवळे यांनी सांगितले की, आपली नियमित दिनचर्या कशी असावी आहार, प्राणायाम, योगा, झोप, एकाग्रता याबाबत माहिती दिली. शिक्षणाबरोबरच, विद्यार्थ्यांना संस्कार, सुसंस्कृतता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असायला हवी. त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवायला या गुणांचा खूप उपयोग होतो. विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे आणि कठीण परिस्थितीतही धैर्याने उभे राहावे, हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच उदोजी होरायझन स्कूलच्या नॅन्सी डोमिनीक यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. विद्यापीठ परिसरात लागवड करण्यात आलेल्या विविध प्रजातिच्या वृक्षांची नंदू सोनजे यांनी माहिती दिली. उदोजी होरायझन स्कूलच्या दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरातील ग्रीन कॅम्पसला भेट दिली. धन्वंतरी सभागृहात प्र-कुलगुरु यांच्या समवेत प्रश्नोत्तराच्या स्वरुपात विविध विषयांवर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.