< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); नाशिक येथे ५-६ जुलैला राज्यस्तरीय ग्रापलिंग पंच व प्रशिक्षक डिप्लोमा प्रमाणपत्र कार्यशाळा  – Sport Splus

नाशिक येथे ५-६ जुलैला राज्यस्तरीय ग्रापलिंग पंच व प्रशिक्षक डिप्लोमा प्रमाणपत्र कार्यशाळा 

  • By admin
  • July 3, 2025
  • 0
  • 226 Views
Spread the love

आंतरराष्ट्रीय रेफरी संजय पवार यांचे विशेष मार्गदर्शन

नाशिक ः महाराष्ट्र राज्यात ग्रापलिंग या कुस्ती प्रकाराचा प्रचार व प्रसार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून ५ व ६ जुलै २०२५ रोजी मीनाताई ठाकरे इंडोअर स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे राज्यस्तरीय पंच व प्रशिक्षक डिप्लोमा प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ग्रापलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व ग्रापलिंग असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) या जागतिक कुस्ती महासंघाचे अधिकृत आंतरराष्ट्रीय रेफरी (Level-III) व ग्रापलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या टेक्निकल कमिटीचे प्रमुख मध्य प्रदेशचे संजय पवार हे दोन दिवस विशेष मार्गदर्शन करणार आहेत. संजय पवार यांचा भारतातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव, तांत्रिक जाण व प्रशिक्षण पद्धती ही महाराष्ट्रातील पंच व प्रशिक्षकांना नव्या दृष्टीने समृद्ध करेल.

या दोन दिवसीय कार्यशाळेत ग्रापलिंग खेळाचे अद्ययावत युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) नियमानुसार नियम व तंत्र, प्रात्यक्षिक सत्र, ऑनलाइन लेक्चर्स, लेखी परीक्षा, तोंडी मुलाखत व फिजिकल डेमो यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल.

या कार्यशाळेत ग्रापलिंग, कुस्ती, ज्युदो, कराटे, तायक्वांदो, मिक्स मार्शल आर्टसह सर्व कॉम्बॅक्ट स्पोर्ट्समधील राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, कोच, स्पोर्ट्स टीचर्स, सीनियर प्लेयर्स सहभागी होऊ शकतात.

ग्रापलिंग हा युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा अधिकृत पाचवा खेळ प्रकार असून फ्री स्टाईल, ग्रीको रोमन व वूमन रेसलिंग नंतर जगभरात तो वेगाने लोकप्रिय होतो आहे. याचं महत्त्व शालेय क्रीडा स्पर्धा, युनिव्हर्सिटी गेम्स, वर्ल्ड आर्मी गेम्स, वर्ल्ड पोलीस फायर गेम्स आणि वर्ल्ड कॉम्बॅट गेम्समध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

ग्रापलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने गेल्या १२ वर्षांत या खेळाचा राज्यभर प्रसार करताना ५ वेळा राष्ट्रीय संघात संघविजेतेपद, तसेच २ रौप्य व ४ कांस्यपदकांची कमाई भारताला जागतिक पातळीवर करून दिली आहे.

कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींना राज्यस्तरीय डिप्लोमा प्रमाणपत्र, सरकारी मान्यताप्राप्त पंच व प्रशिक्षक लायसन्स, व युनिफॉर्म देण्यात येणार आहेत. हे प्रमाणपत्र भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण व पंच प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पात्रता प्रदान करेल.

कार्यशाळेत सहभागासाठी इच्छुकांनी www.grappingmaha.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन ग्रापलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षा अर्चना देशमुख यांनी केले आहे.

या कार्यशाळेद्वारे प्रशिक्षक व पंचांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत अधिक उंची गाठावी, महाराष्ट्रातील शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ग्रापलिंगला नवीन उभारी मिळावी, हा प्रमुख उद्देश असल्याचे ग्रापलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव आणि टेक्निकल डायरेक्टर, ग्रापलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर संतोष देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *