यंदा प्रथमच क्रीडा क्षेत्रासाठी विविध पुरस्कारांची होणार घोषणा
सोलापूर ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून यंदाच्या वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार’ देण्याबाबत निर्णय झाला असून या पुरस्कारांसाठी १५ जुलै २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अतुल लकडे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी १ ऑगस्ट रोजी जीवनगौरव पुरस्कारासह उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी, उत्कृष्ट संस्था, उत्कृष्ट महाविद्यालय या पुरस्कारांचे सन्मानपूर्वक वितरण होते. यंदाच्या वर्षापासून कुलगुरू प्रा.प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा क्षेत्रासाठी देखील विविध पुरस्कार देण्याबाबत निर्णय झालेला आहे. त्या अनुषंगाने खेळ, शारीरिक शिक्षण, व्यायाम व क्रीडा क्षेत्रामधून अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार देण्याबाबत रचना करण्यात आली आहे.
त्यानुसार उत्कृष्ट क्रीडा शिक्षक, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता, उत्कृष्ट शारीरिक शिक्षण अध्यापक व संचालक असे चार पुरस्कार यंदाच्या वर्षीपासून देण्यात येणार आहे. या चारही पुरस्कारांकरिता नियमावली व विविध अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबत संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविण्यात आले आहे. तरी या पुरस्कारांसाठी १५ जुलै २०२५ पर्यंत तीन प्रतीत आवश्यक कागदपत्रांसह संबंधितांनी त्या-त्या विभागाचे प्रमुख म्हणजे प्राचार्य, मुख्याध्यापक, संपादक किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अतुल लकडे यांनी केले आहे.