
रत्नागिरी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत तीन गटात राखला दबदबा
डेरवण ः सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेत रत्नागिरी येथील सेंट थॉमस स्कूल संघाने शानदार कामगिरी नोंदवत विजेतेपद पटकावले. १५ वर्षांखालील मुलांच्या गटात तसेच १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात विजेतेपद पटकावत सेंट थॉमस स्कूल संघाने तिहेरी मुकुट संपादन केला.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये १५ वर्षांखालील मुलांमध्ये नऊ संघ, १७ वर्षांखालील मुलांमध्ये १३ संघ आणि १७ वर्षाखालील मुलींमध्ये एकूण ७ संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत एकूण ४६४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
शालेय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ या क्रीडा स्पर्धेने होतो त्यामुळे खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. स्पर्धेचे उद्घाटन सेंट थॉमस हायस्कूलचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक कृष्णा गावडे यांच्या हस्ते मैदान पूजन आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे सचिन मांडवकर, डेरवण क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर, रत्नागिरी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद परांजपे, क्रीडा शिक्षक अजित दवडे, चंदन सनगरे, कृष्णा गावडे, उमाकांत बागवे, अनिल पडवळे, आशिष कानपडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी मुकुल सोमण यांनी पार पाडली.

या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांमध्ये सेंट थॉमस स्कूल, रत्नागिरी या संघाने अंतिम सामन्यात एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूण या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तसेच रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये सेंट थॉमस, रत्नागिरी संघ सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपदाचा मानकरी संघ ठरला. तर उपविजेतेपद रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड संघाने मिळविले. तसेच तृतीय क्रमांक एसव्हीजेसीटी इंग्लिश मीडियम स्कूल, डेरवण संघाने पटकावले.
१७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट थॉमस, रत्नागिरी संघाने सेक्रेड हार्ट कॉन्वेंट स्कूल, रत्नागिरी या संघासोबत रोमहर्षक खेळ करून विजेतेपद पटकाविले. एसव्हीजेसीटी इंग्लिश मीडियम स्कूल, डेरवण संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
सदर स्पर्धेतील यशस्वी संघ रत्नागिरी जिल्ह्याचे कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत. गेल्या दोन वर्षापासून विभाग स्तरावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या रत्नागिरी फुटबॉल संघाचे उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पावसाळी वातावरण व हिरवळीने अच्छादित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या मैदानावर खेळताना जणू आंतरराष्ट्रीय सामन्यातच खेळण्याची संधी मिळाली आहे, अशा भावना अनेक खेळाडूंनी व्यक्त केल्या.