मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

  • By admin
  • July 4, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद

जळगाव ः रंग, रूप, वेश, भाषा हे आपल्या मनाप्रमाणे असेल असे नाही ते आपल्या हातात नाही, मात्र माझ्या हातातून घडणारी एखादी कृती ही जगात बदल घडवू शकते. अंधारात दीपक ज्याप्रमाणे प्रकाशाचे कार्य करतो तशी मनाची भावना आपल्याला सुंदर करते, त्यासाठी बाह्य स्वरूपाचा विचार न करता मनाची सुंदरता कशी वाढेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असा प्रेरणादायी संवाद अनुभूती रेसिडेंशियल स्कूलच्या विद्यार्थ्यांशी स्मिता पाटील-वळसंगकर यांनी साधला.

अनुभूती रेसिडेंशियल स्कूलच्या असेंम्बली हॉल मध्ये झालेल्या सुसंवादाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य देबाशिस दास, स्मिता पाटील-वळसंगकर, गिरीष कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला विद्यार्थ्यांनी नवकार मंत्र म्हटला. यानंतर स्मिता पाटील-वळसंगकर यांनी विद्यार्थ्यांशी गृप अॅक्टीव्हिटी घेतली. संवादाविषयी दैनंदिन वातावरणात स्वत:च्या मनात निर्माण झालेले प्रश्न, ते ताणतणाव करणारे असतो की करिअरबद्दल असो ती स्टिकी नोटवर लिहून, चार्ट पेपरवर विद्यार्थ्यांनी चिकटवले. 

त्यानंतर शॉर्टफिल्म दाखविण्यात आली. त्यातून ‘Me Indifferent, Fall, Different, Hope’ म्हणजे,  मी निर्दयी, अयशस्वी होणे, वेगळेपण सिद्ध करणे, आशावादी राहणे ह्या विषयावर चर्चात्मक भाष्य करण्यात आले. आपल्याशी दुसऱ्याने जसे वागले पाहिजे, तसे वाटणे या विचारातूनच आपण वागले पाहिजे. चुक झाली तर पश्चातापातून विधायक कृती घडली पाहिजे. स्क्रीन टाईम, सोशल कनेक्टीव्हीटी, झोप, योग्य आहार, व्यायाम, खेळणे, अभ्यास, नवीन काही शिकणं, निरपेक्ष काम, दुसऱ्यांविषयी कृतज्ञता यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली.

अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

गरज, सोय, चैन ओळखून उपलब्धता करावी

स्मिता पाटील-वळसंगकर यांनी दुपारच्या सत्रात नव्याने सुरू झालेल्या अनुभूती विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधला. यावेळी मनोज परमार, गिरीष कुलकर्णी उपस्थित होते. पालकांनी मुलांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. जे द्यायचे आहे ते शिस्तीतून दिले पाहिजे. गरज, सोय व चैन या तीन गोष्टींचा विचार करुन ती उपलब्ध करुन द्यावी. कौटुंबिकस्तरावर आपल्या पाल्याच्या भल्यासाठी आठवड्यातून एकदा मिटींग घेतली पाहिजे. मुलांशी मुलाप्रमाणेच संवाद साधावा, मन शांत असेल तरच बदल घडू शकतो. त्याला सुरक्षित भासेल असा संवाद असावा. ‘गूड टच बॅड टच’ या शब्दप्रयोग ऐवजी ‘सेफ आणि अन सेफ टच’ वापरावा. मुलांना खूप सार्‍या गोष्टींचे आकर्षण असते, त्यांना अनेक प्रश्न असतात. त्यासाठी त्यांच्याशी संवाद गरजेचा आहे. पालकांनी अपडेट असले पाहिजे. काळासोबत जायचे असेल तर पालकत्व समजून घेतले पाहिजे. मुलांना त्यांची त्यांची कामे करू द्यावी. त्यांना सवय लावली पाहिजे त्यातूनच त्यांना शिस्त लागते. खाण्या-पिण्याच्या सवयी यावर लक्ष दिले पाहिजे. फास्ट फूड आणि जंक फूड पासून मुलांना दूर ठेवले पाहिजे. कोणतेही काम करताना मुलांना सोबत घेतले पाहिजे असे मार्गदर्शन असे स्मिता पाटील-वळसंगकर यांनी केले. रविंद्रनाथ टागोरांच्या ‘आम्ही आकाश बघू.. आम्ही झाडे बघू..’ ह्या प्रार्थनेने समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *