
सहा फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर इंग्लंड चारशे पार, सिराजचे सहा विकेट
एजबॅस्टन : मोहम्मद सिराज (६-७०) आणि आकाश दीप (४-८८) यांच्या घातक गोलंदाजीसमोर इंग्लंड संघाचा पहिला डाव ४०७ धावसंख्येवर संपुष्टात आला. हॅरी ब्रूक (१५८) व जेमी स्मिथ (नाबाद १८४) यांची ३०३ धावांची भागीदारी चर्चेचा विषय ठरली. या भागीदारीने भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरवली. मात्र, ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. सहा फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतरही इंग्लंडने चारशे धावांचा टप्पा गाठला हे विशेष. भारतीय संघाने १८० धावांची आघाडी घेत दुसऱ्या कसोटीवर आपली पकड भक्कम केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने एक बाद ६४ धावा काढल्या आहेत. भारतीय संघ २४४ धावांनी आघाडीवर आहे.
पहिल्या डावात १८० धावांची आघाडी घेतल्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात धमाकेदार केली. यशस्वी जैस्वाल याने १० धावा करताच २ हजार कसोटी धावांचा मोठा टप्पा गाठला. यशस्वीने ही कामगिरी केवळ ४० कसोटीत केली आहे. यशस्वी याने राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग यांची बरोबरी साधली आहे. त्यांनीही २ हजार धावांचा टप्पा ४० कसोटीत गाठला होता. यशस्वी २८ धावांवर पायचीत बाद झाला. तेव्हा भारताच्या ५१ धावा झालेल्या होत्या. यशस्वीने २२ चेंडूत ६ खणखणीत चौकार मारले.
जोश टंग याने यशस्वीची विकेट घेतल्यानंतर करुण नायर मैदानात उतरला. नायर-राहुल जोडीने काही षटके खेळून काढली. १३ षटकांच्या खेळात भारतीय संघाने एक बाद ६४ धावा काढल्या. राहुल २८ तर करुण नायर ७ धावांवर खेळत आहेत. टंग याने १२ धावांत एक गडी बाद केला.
इंग्लंड सर्वबाद ४०७
तिसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने इंग्लंडला ४०७ धावांवर गुंडाळले. भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या होत्या. या आधारावर भारतीय संघाने १८० धावांची आघाडी मिळवली आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ तीन बाद ७७ या धावसंख्येने सुरू करणाऱ्या इंग्लंडला सुरुवातीलाच दोन धक्के सहन करावे लागले. मोहम्मद सिराज याने दिवसाच्या दुसऱ्या षटकात इंग्लंडला सलग दोन धक्के दिले. प्रथम, त्याने जो रूट (२२) ला बाद केले. पंतने रुट याला झेलबाद केले. त्यानंतर, त्याने कर्णधार बेन स्टोक्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्टोक्स धावांचे खाते देखील उघडू शकला नाही. ८४ धावांवर पाच विकेट गमावलेल्या इंग्लंड संघासाठी हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ हे ‘ट्रबल शूटर’ ठरले. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ३६८ चेंडूत ३०३ धावांची भागीदारी झाली. या दरम्यान, जेमी स्मिथने ८० चेंडूत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले तर स्मिथने १३७ चेंडूत त्याचे नववे कसोटी शतक पूर्ण केले.
दुसरे सत्र पाच बाद ३५५ च्या धावसंख्येने संपले. तथापि, तिसऱ्या सत्रात आकाश दीपने हॅरी ब्रूक याला आपला बळी बनवले आणि स्मिथसोबतची ३०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी मोडली. २३४ चेंडूत १७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५८ धावा काढल्यानंतर ब्रूक बाद झाला. त्याच वेळी, २०७ चेंडूत २१ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १८४ धावा काढल्यानंतर स्मिथ नाबाद राहिला. स्मिथ व्यतिरिक्त, आकाश दीपने तिसऱ्या सत्रात ख्रिस वोक्सला करुण नायर कडून झेलबाद केले. तो फक्त पाच धावा काढू शकला. यानंतर, सिराजने ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तिघेही आपले खातेही उघडू शकले नाहीत. इंग्लंडच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने सहा आणि आकाश दीपने चार बळी घेतले. या डावात इंग्लंडचे तब्बल सहा फलंदाज शून्यावर बाद झाले हे विशेष.