
जागतिक क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रमाची नोंद
लंडन ः भारतीय महिला संघ इंग्लंड संघाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी २० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजयी मोहीम सुरू ठेवू शकला नाही. यजमान संघाने लंडनमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेल्या या मालिकेतील तिसरा टी २० सामना अवघ्या ५ धावांच्या फरकाने जिंकला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या महिला संघाने ९ विकेट गमावून १७१ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ २० षटकांत ५ विकेट गमावून १६६ धावांपर्यंत पोहोचू शकला. रोमांचक सामना भारतीय संघाने केवळ पाच धावांनी गमावला. त्याच वेळी, या सामन्यात एक असा विश्वविक्रमही रचला गेला जो आतापर्यंत पुरुष आणि महिला क्रिकेटच्या इतिहासात कधीही झाला नव्हता.
इंग्लंडने फक्त २५ चेंडूत ९ विकेट गमावले
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांना पहिली विकेट मिळविण्यासाठी १५.२ षटकांची वाट पाहावी लागली. इंग्लंडने १३७ धावांवर सोफी डंकलीची पहिली विकेट गमावली. त्यानंतर भारतीय संघाने १९.२ षटकांत इंग्लंडच्या ९ खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे, भारतीय महिला संघाने फक्त २५ चेंडूत एकूण ९ विकेट्स घेतल्या. क्रिकेटच्या इतिहासात, पुरुष असो वा महिला आंतरराष्ट्रीय, तिन्ही फॉरमॅटमध्ये, इतक्या कमी चेंडूत एखाद्या संघाने ९ खेळाडू गमावल्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजीत अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा यांनी ३-३ विकेट्स घेतल्या तर श्री चरणी यांनी २ विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड महिला संघ – २० षटकात नऊ बाद १७१ (सोफिया डंकले ७५, व्याट हॉज ६६, सोफी एक्लेस्टोन १०, अरुंधती रेड्डी ३-३२, दीप्ती शर्मा ३-२७, श्री चरणी २-४३, राधा यादव १-१५) विजयी विरुद्ध भारतीय महिला संघ – २० षटकात पाच बाद १६६ (स्मृती मानधना ५६, शफाली शर्मा ४७, जेमिमा रॉड्रिग्ज २०, हरमनप्रीत कौर २३, रिचा घोष ७, अमनजोत कौर नाबाद ७, लॉरेन फाइलर २-३०).