
नवी दिल्ली ः सुपर युनायटेड बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेत्या डी गुकेश याने तीन गुणांची आघाडी घेतली आहे. गुकेश याने वेस्लीला हरवले आणि रॅपिड प्रकारात अव्वल स्थान पटकावले आहे.
मॅग्नस कार्लसनला पराभूत केल्यानंतर विश्वविजेता डी गुकेश याने ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धांमध्ये आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि रॅपिड प्रकारात अव्वल स्थान पटकावले. त्याने शेवटच्या नवव्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोचा पराभव केला. त्याचे एकूण १४ गुण होते आणि त्याने तीन गुणांची मोठी आघाडी घेतली आहे.
प्रज्ञानंदाने सातव्या फेरीत इव्हान सेरिकला पराभूत केले. तो नऊ गुणांसह कारुआनासह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. गुकेशने तिसऱ्या दिवशी दोन ड्रॉ खेळले आणि नंतर वेस्लीला पराभूत केले. तो नवव्या फेरीत दुडाविरुद्ध हरला, दोन ड्रॉ खेळला, ६ जिंकले. ब्लिट्झमध्ये १८ फेऱ्या खेळल्या जातील, गुकेशची ३ गुणांची आघाडी येथे उपयोगी पडेल.
झाग्रेब. विश्वविजेत्या डी गुकेशविरुद्धच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर, जागतिक नंबर वन आणि पाच वेळा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याने सांगितले की त्याला आता बुद्धिबळ खेळण्याचा आनंद राहिलेला नाही. सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ स्पर्धेच्या रॅपिड श्रेणीतील सहाव्या गेममध्ये गुकेश याने माजी विश्वविजेत्याला हरवले. यापूर्वी, त्याने गेल्या महिन्यात नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत क्लासिकल स्वरूपात त्याला हरवले होते. नॉर्वेमध्ये झालेल्या पराभवानंतर, त्याने राग आणि निराशेने टेबलावर मुक्का मारला होता.